भूमिका

भूमिका.

एक छोटंसं नाटक.

एक लेखक/दिग्दर्शक, दोन तंत्रज्ञ आणि दोनच कलाकार.

विनीता पिंपळखरे यांनी साध्यासोप्या शब्दात दमदार लिखाण केलय आणि मधुराणी प्रभुलकर अन गिरीश परदेशी यांनी जीव ओतून काम केलय. ध्वनी आणि प्रकाश कमीत कमी परंतु तंतोतंत वापरून देखील मंत्रमुग्ध करून टाकणारी हि कलाकृती आहे.

एक आव्हान म्हणून, नुकतेच भेटलेले मनोज आणि मानसी, नवरा आणि बायकोची भूमिका करायचं ठरवतात आणि मग ह्या नाटकाच्या आत दुसरं आणि तिसरं नाटक कळत नकळत उलगडत जातं. पण शेवटी नुकत्याच उमललेल्या गुलाबाप्रमाणे काही पाकळ्या जरी मोकळ्या झाल्या तरी मधली कळी अनाकलनीय आणि रहस्यमयी राहून जाते, आपल्या आयुष्यातील कितीतरी प्रसंग आणि कित्येक व्यक्ती गूढच राहून जातात, तसेच.

त्यामुळे, नाटक संपल्यानंतर गिरीश आणि मधुराणी पेक्षा जास्त मनोज आणि मानसीला पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटतं, कारण हि पात्र तुमच्या आमच्यासारखी असुरक्षित आहेत आणि तरीही अगदी विश्वासार्ह आहेत.  हाच ह्या लेखक आणि नटांच्या कलेचा विजय आहे.

काही क्षणांचा लक्ष कालावधी (attention span) असलेल्या आधुनिक  प्रेक्षकांना तब्बल नव्वद मिनिटे खुर्चीला खिळवून ठेवणारं हे नाटक नक्कीच बघायला हवं.

माझ्या शेजारी बसलेली माउली आधी आपला मोबाईल हातातून सोडायला तयार नव्हती, पण नाटक सुरु झाल्यानंतर तिनी एकदाही तो मोबाईल बघितला नाही, त्यावर गजर वाजायला लागला तरीही.

ह्यापेक्षा जास्त दाद काय मिळणार आजकाल?

 

© अविनाश पां चिकटे

https://www.facebook.com/AvinashPChikte/