ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी

ह्या स्वातंत्र्यदिनी आलेल्या अनेक शुभेच्छा संदेशांमधे एक अत्यंत वेगळा फोटो होता, जो बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं.

आणि त्यानंतर डोळ्यात पाणी आणणारी आणखी एक घटना घडली.

सुट्टी असल्याने प्रभात फेरीसाठी सकाळी उशिरा बाहेर पडलो आणि भरपूर चालून परत येताना घराजवळ ठप्प झालेल्या वाहतुकीमधे अडकलो. काही तरुणांनी एक ट्रक आणि खूप मोटारसायकली आडव्या लावून रस्ता बंद केला होता. कोणी फ्लेक्स लावत होता, कोणी खड्डा खणत होता आणि एकजण दोरीशी खेळत होता.

“अहो,” मी जरा दबक्या आवाजात त्याला म्हणलं, “मला घरी जायचंय.”
“मायदेशावर प्रेम नाय का?” त्यानी माझ्याकडे न बघताच गुरकावून विचारलं.
देशप्रेमाचा आणि घरी जाण्याचा काय संबंध? पण ते लोक जरा गुंडांसारखे दिसत होते म्हणून मी विचारलं नाही. फक्त म्हणालो, “म्हणजे काय?”
“पाकिस्तानी का तुमी?”
“हे पुणे आहे का पेशावर? आणि मराठी बोलू शकणारे किती पाकिस्तानी लोक तुम्ही ओळखता?” हे मी न विचारलेले प्रश्न.
“मी भारतीय आहे.” मी म्हणालो.
“मग थांबा की.” तो म्हणाला.
“पण इथे नक्की काय चाललंय?”
“आज काय दिवस हाय तुमाला ठाव नाय?”
आता मलाही जरा राग यायला लागला होता. त्याची फिरकी घ्यावी म्हणून मी डोकं हलवलं आणि म्हटलं, “मी म्हातारा होत चाललोय, त्यामुळे आठवत नाही आजकाल. तुम्हीच सांगा.”
तो एकदम दचकला आणि त्यानी पहिल्यांदा दोरीशी खेळणं सोडून माझ्याकडे बघितलं.
“ए गजा.” त्यानी एकाला हाक मारली. “आज कसला दिवस हाय रं?”
“झेंडा बंधन.” खड्डा खोदणं थांबवून तो गजा उत्तरला.
“झेंडा बंधन?” मी आश्चर्याने उद्गारलो.
निर्विकारपणे तो म्हणाला, “खांबाला झेंडा बांधायलाच आलोयकी आमी.”
“हो हो, आता आलं लक्षात.” मी म्हटलं आणि घाई केली तर मला देशद्रोही ठरवलं जाईल म्हणून खोट्या उत्साहानी विचारलं, “अरे वा! कधी सुरू होणार कार्यक्रम?” खरं म्हणजे कधी संपणार असं मला विचारायचं होतं.
“नऊ वाजता नेताजी येणार, मंग व्हईल.” त्यानी भिंतीवर टांगलेल्या मोठ्या फ्लेक्स कडे बोट करून सांगितलं.

मी घड्याळ बघितलं तर सव्वा नऊ वाजले होते. नाईलाजाने मी त्या फ्लेक्सकडे बघू लागलो. त्यावर महात्मा गांधींपासून अनेक आजी माजी नेत्यांचे फोटो होते. आणि सगळ्यात मोठा फोटो होता ह्यांच्या नेताजींचा. आश्चर्य म्हणजे सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो त्या बोर्डावर होते. लोकसभेत भांडणारी मंडळी इथे हसत खेळत प्रेमानी नांदत होती. आधी मला वाटलं की स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर सगळे वैचारिक आणि तात्विक मतभेद विसरावेत असं ह्या नेताजींना सुचवायचं असेल, पण मग लक्षात आलं की पुढच्या निवडणुकीसाठी ते आपले सगळे मार्ग खुले ठेवत होते.

शेवटी आपल्या इंपोर्टेड गाडीतून त्यांचे ते नेताजी साडेनऊ वाजता उगवले. म्हणजे देशप्रेम सुद्धा स्वतःची सोय बघून करायचं असतं हे मला तेव्हा कळलं. कडक स्टार्च केलेले पांढरे शुभ्र खादी कपडे, पांढरी चप्पल आणि गांधी टोपी घालून कपडे धुण्याच्या साबणाच्या जाहिरातीत असल्यासारखे ते चमकत होते.

आधी त्यांनी तेव्हढी शुभ्र नसलेली बत्तीशी दाखवत सगळ्यांना नमस्कार वगैरे केले आणि मग वेळेवर तयार न झालेल्या त्या कार्यकर्त्यांना अर्वाच्य शिव्या हासडल्या. ते लोक अजुनही रस्त्यावर खड्डा खणत होते झेंड्याचा खांब उभारण्यासाठी.

त्या पोरांनी घाईघाईत तो खांब त्या खड्ड्यात रोवला, खड्डा बुजवला आणि घडी करून झेंडा दोरीला बांधला.

आम्हा सगळ्यांना झेंड्याच्या भोवती उभं करवून कार्यकर्ते आमच्या मागे पहारा देत उभे ठाकले. मग नेताजी अत्यंत गंभीरपणे दमदार पावलं टाकत हळूहळू चालत त्या खांबापाशी आले. एका चेल्याने दिलेली दोरी त्यांनी हातात घेतली आणि आमच्याकडे बघून ते काहीतरी खेकसले. त्यांच्या तोंडात तंबाखूचा बकाणा असल्याने ते नक्की काय म्हणाले हे कोणालाच कळलं नाही पण त्यांच्या चेल्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणून आम्हीही वाजवल्या.

“क्या बोले भाई साहब?” असं एका सारदारजींनी विचारल्यावर त्या खांबाच्या पायथ्याशी तोंडातली तंबाखू थुंकून नेताजी म्हणाले, “हम सबकू, अपने देशपर, प्रेम करनेको मंगता.”

“इंग्लिश प्लीज.” आमच्या कॉलनीत राहणारा सुब्रमण्यम उगाचच ओरडला. नको तेव्हा आपण खूप कॉस्मोपॉलिटन असल्याच तो सांगत असतो आणि आम्ही नमस्कार म्हणल्यावर गुड मॉर्निंग, आणि आम्ही गुड मॉर्निंग म्हटलं तर ‘वणक्कम’ असं उत्तर देतो. पण इथे त्यानी नेताजींची विकेट घेतल्यासारखं दिसत होतं.

त्याच्याकडे बघत थोडावेळ विचार केल्या नंतर त्याला उद्देशून नेताजी म्हणाले, “वुई मस्ट लव्ह माय कन्ट्री लाईक वुई लव्ह युअर वाईफ.”

त्याचं इंग्रजी कच्चं आहे का ते सुब्रमण्यमला अडवा करण्यासाठी मुद्दाम तसं बोलले हे मला समजलं नाही, परंतु त्याचं बहुभाषिक देशप्रेम ऐकून त्यांच्या चाहत्यांनी पुन्हा जोरजोरात टाळ्या वाजवल्या. सुदैवाने त्या टाळ्यांच्या कडकडाटात सुब्रमण्यम काय पुटपुटला हे फक्त मला ऐकू आलं, पण ते इथे लिहिण्यासारखं नाहीये.

मग नेताजींनी खूष होऊन हसत हसत, हळूहळू, दोरी ओढली आणि तो बांधलेला झेंडा वर गेला अन बांधलेला राहिला. नेताजींनी दोरी पुन्हा खेचली तरी तो झेंडा बांधलेलाच राहिला. दात ओठ खात त्यांनी जोरात दोरी खेचली. झेंडा काही उघडला नाही, पण खांब नेताजींकडे वाकला. खोदून परत भरलेल्या जमिनीला न जुमानता तो खांब झुकत राहिला, कोणीतरी किंचाळलं आणि प्रसंगाचं गांभिर्य विसरून नेताजींनी रस्त्याकडेच्या झाडामागे धूम ठोकली.

दोघा तिघांनी तो खांब पकडून अलगद खाली ठेवला, मग पुन्हा शिव्यांची मशीन-गन झाडली गेली, तो खड्डा आणखी खोलवर खोदण्यात आला आणि ह्यावेळेस झेंडा आधीच उघडून दोरीला बांधला गेला. नेताजींनी तो वरती चढवला आणि आम्ही पुन्हा टाळ्या वाजवल्या.

नेताजी झाडाखाली सावलीत जाऊन उभे राहिले आणि एकजण ओरडला, “आता आपले लाडके नेताजी सीमेवरच्या शूरवीर जवानांच्या बद्दल दोन शब्द बोलतील.”

“थांबा! तो झेंडा उलटा आहे.” मी ओरडलो, हिंदी सिनेमात “ठैरो! ये शादी नही हो सकती.” ओरडतात तसं.
“काय? को…कोण तुमी? तुमाला कसं माहित?”
“मी एयर फोर्स मधे होतो.” मी म्हणालो.
“येर फोर? त्ये काय असतंय?”
“भारतीय वायू सेना.” मी सांगितलं.
त्या शहाण्यानी इंग्रजी आणि मराठीचा सुवर्णमध्य गाठून, मला खालून वर न्याहाळत विचारलं, “हा हा, भारत फोर्ज व्हय? आमचे दाजी हायत तिथं सिक्युरिटीत. तुम्ही काय करता तिथं?” मी त्याच्या दाजींसारखा सिक्युरिटीत काम करायच्या लायकीचा नाही हे मत त्याचा चेहेरा स्पष्ट सांगत होता.

“गपरे गण्या, कायबी बोलत बसतो xxxx.” दुसरा त्याला बोलला आणि मग मला उद्देशून त्यानी विचारलं, “उलटा म्हंजे कसा?”
“आरं, तू पायजमा उलटा घातला तर नाडी कशी खोलशील, येड्या?” गण्याला गप्प बसणं अशक्य दिसत होतं. त्याचं लग्न झालं नसावं.
“आरपन, हिकडून काय तिकडून काय, पुडून काय अन मागून काय, झेंडा तस्साच दिसत हाय की.”
“अहो, तसं नव्हे, रंग वरखाली झालेत.” मी समजावलं.
“आयला, ही पण भानगड हाय व्हय?”

आपलं ज्ञान दाखवायला नको म्हणून इतका वेळ गप्प असलेल्या नेताजींनी मग पुन्हा शिव्या हासडल्या आणि पुन्हा तो झेंडा काढून नीट लावण्यात आला.

त्यानंतर आमच्या सुदैवाने नेताजींनी आपल्याला भाषण देण्याचा मूड नसल्याचं सांगितलं आणि “गाणी लावा रे”असा हुकूम सोडला. भिंतीएवढया मोठया लाउडस्पीकर मधून अचानक, ‘ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं’ हे गाणं सुरू झालं.

“ए xxxx मेरे वतन के लोगो?” ती शिवी ह्यांच्या कार्यकर्त्यांना नसून मेरे वतन के लोगोंना आहे असं मला आधी वाटलं, पण मग कळलं कि आपण सगळे वर्षातून एकदाच ऐकतो त्या गाण्याबद्दल ते विचारात होते.
“घरी विसरलो, अनाया घडलाय गणप्याला.”
“आजून कोणाकडं न्हाय?”
“माज्याकडं पेन ड्राइव्ह हाय.” असं म्हणत ट्रकचा ड्रायव्हर गाडीतून ती घेऊन आला आणि मिठाई वाटताना ती पेन ड्राइव्ह वरची गाणी सुरू झाली.

तो ड्रायव्हर खूपच बहुगुणी असावा, कारण त्याच्या पेन ड्राइव्हवर मीराबाई हरीभक्ती मधे तल्लीन झाल्यानंतर (मीरा हो गयी मगन) राष्ट्रप्रेम सुरु व्हायचं (मेरे वतन के लोगो) आणि ते संपल्यावर लगेचच एका साध्या, सोज्ज्वळ, इभ्रतदार मुलीचं नाव खराब व्हायचं! (मुन्नी बदनाम हुई)

त्यांनी सोडल्यावर लगेचच मी घाई घाईने घरी आलो आणि दारं खिडक्या बंद करून कानात कापूस घालून दिवसभर हिंदी चित्रपटांच्या गाण्यातून व्यक्त होणारं त्याचं ते कर्कश्य देशप्रेम नाईलाजानी ऐकत बसलो.

अंधार पडल्यानंतर त्या लोकांनी काहीतरी उत्साहवर्धक पेय घेतली असणार, कारण त्यांनी डिस्को लाईट आणि ‘आयटम सॉंग’ म्हणतात ती गाणी – जुम्मा चुम्मा दे दे, मंगता है तो आ जा रसिया वगैरे – लावून नवीन जोमानी नाचायला सुरवात केली. रात्र वाढत गेली तसा आवाज वाढत गेला आणि शेवटी त्या गाण्यांच्या आवाजापेक्षाही मोठ्या स्फोटात विजेचा ट्रान्सफॉर्मर उडाला आणि आमचा सगळा परिसर अंधारात आणि देव दयेनी शांततेत बुडाला.

सोळा तारखेला सकाळी कामावर जायचं होतं म्हणून सूर्योदयाच्या आधीच फिरायला बाहेर पडलो. ट्रान्सफॉर्मर उडाला असल्याने रस्त्यावरचे दिवे बंद होते. अंधारात वेगाने चालताना त्या कालच्या झेंड्यासाठी खणलेल्या खड्ड्यात पडून पाय मुरगळला आणि तीव्र वेदनेमुळे डोळ्यात पाणी आलं.

म्हणजे चोवीस तासात देशप्रेमाचे दोन प्रकार पाहून दोनदा डोळ्यात पाणी आलं आणि स्वातंत्र्य सूर्याचा प्रकाश अजुनही पूर्णपणे पडायचा आहे हे प्रकर्षाने जाणवलं.

©अविनाश पां चिकटे

https://www.facebook.com/AvinashPChikte/

हा लेख ‘साहित्य चपराक’ नोव्हेंबर २०१७ या मासिकामधे प्रकाशित झाला आहे.