वाट वेगळी…

२०१२ साली माझा १९ वर्षांचा मुलगा, अग्नेय, बी कॉम करत होता आणि त्याबरोबरच त्याचा CA म्हणजे Chartered Accountant किंवा सनदी लेखापाल बनण्यासाठी अभ्यास चालू होता.

CA होण्यासाठी पहिली पायरी असते, Common Proficiency Test (CPT) आणि दुसरी असते IPCC. CPT बरीच अवघड असते आणि फार तर चाळीस टक्के विद्यार्थी त्यात पास होतात. IPCC त्याहीपेक्षा कठीण असते आणि केवळ पंचवीस एक टक्के विद्यार्थी ती पास होतात.

तो पहिल्याच प्रयत्नात CPT खूप चांगल्या मार्कांनी पास झाला होता आणि IPCC ची तयारी करत होता. रोज बारा ते पंधरा तास तो कॉलेज, क्लास आणि अभ्यास करायचा.

इतर सर्व मध्यमवर्गीय पालकांप्रमाणे आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटायचं आणि आम्ही त्याच्या भविष्याची स्वप्नं बघण्यात रंगून जायचो. त्यानी सरकारी नोकरी करावी, का खाजगी कंपनीत करावी का स्वतःचं ऑफिस थाटावं यावर त्याची आई आणि माझ्यामध्ये खूप गप्पा चालायच्या.

एका रविवारी माझ्या अचानक लक्षात आलं की हा मुलगा अत्यंत गंभीर चेहरा करून बसला आहे. मला वाटलं त्याची तब्येत वगैरे बरी नसावी, पण एकोणीस वर्षाच्या धडधाकट तरुणाला मलेरिया पेक्षा लवेरिया व्हायची शक्यता जास्त असल्यामुळे मी त्याला सहज विचारलं, “सगळं काही ठिकठाक आहे ना तुझं?”

तो फक्त “हो” म्हणाला, पण त्याच्या चेहर्‍यावरचे भाव ओरडून ओरडून सांगत होते, “अजाण पालका, तुला काहीच कसं कळत नाही?” त्यामुळे मी त्याला पुढे काही विचारलं नाही.

नाश्त्यानंतर तो त्याच्या खोलीत घुसल्यावर मी त्याच्या आईला विचारलं, “हा इतका गंभीर होऊन का हिंडतोय? प्रेमाबिमात पडलाय का?”

“अशक्य!” ती म्हणाली, “माझं बाळ अभ्यासात इतकं मग्नं आहे की त्याला असल्या गोष्टींचा विचार करायला वेळच नाही.”

मग विचार आला मनात, कि त्याचे आईबरोबर काही मतभेद झाले असतील. कटु अनुभवावरून मला माहिती आहे की आमच्या आख्ख्या खानदानात तिच्याशी मतभेद असलेला माणूस सुखी राहू शकत नाही!

शेवटी न राहवून मी तिला विचारलं, “तू काही म्हणालीस का त्याला?”

“अजिबात नाही. म्हणण्यासारखं काही आहेच काय त्याला? इतका शहाणा मुलगा आहे तो. तुम्हीच काहीतरी बोलले असाल त्याला. म्हणूनच बिचारा इतका दुःखी दिसत होता.”

कुठल्याही कौटुंबिक कलहात नेहेमीप्रमाणे पहिला संशय माझ्यावर घेण्यात आला!

“अग मी आठवडाभर घरीच कुठे होतो?” मी बचावाचा निष्फळ प्रयत्न केला.

मग दुपारी जेवणानंतर आम्ही दोघांनी त्याला समोर बसवलं आणि विचारलं, “तुला काही हवंय का? कुठे जायचंय का? कोणाला भेटायचयं का?” एखादी मैत्रीण लपवलेली असेल तर पाहावं म्हटलं.

आश्चर्याने माझ्याकडे बघत तो गंभीरपणे म्हणाला, “नाही.”

मी नेटाने बोलत राहिलो, “मी बघतोय की तू खूप अभ्यास करतोयस. आम्हाला दोघांनाही तुझं खूप कौतुक वाटतं. पण असंही वाटतं की अधून मधून तू अभ्यास सोडून थोडा आराम करावा. तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर दोन दिवस कुठे फिरून येतोस का? किती पैसे देऊ तुला?”

एखाद्या अति गोड बोलणाऱ्या पोलिसाकडे चोरानी संशयाने बघावं, तसा तो माझ्याकडे बघत होता. पण पैशाची गोष्ट निघाल्यावर बहुतेक त्याच्यातला CA जागा झाला असावा कारण त्याचा चेहरा अचानक खुलला आणि त्यानी मला विचारलं, “मी खरच सांगू का मला मनापासून काय हवंय?”

“तुला काय पाहिजे ते माग. मी नक्की देईन!” निवडणुकीच्या आधी आपले राजकीय नेते करतात तशी घोषणा करत मी उभा राहिलो.

“मला CA व्हायचं नाहीये.” असं शांतपणे उच्चारून त्यानी मला ‘जोर का झटका धीरेसे’ दिला.

“काय?” मी ओरडलो. वाटेल ती आश्वासनं देऊनही निवडणूक हरलेल्या उमेदवारासारखा मी हताश झालो आणि हवा गेलेल्या फुग्यासारखा सोफ्यात पडलो.

“CA नाही व्हायचं तर काय होणार?”

“मी एक व्यावसायिक वादक होणार.”

क्षणभर मला वादक म्हणजे काय हे लक्षातच आलं नाही. आधी वाटलं व्यावसायिक वादक म्हणजे कुठल्याही विषयावर वाद घालू शकणारा तज्ञ असावा. हे काम त्याच्या आईला फार छान जमतं असं माझं मत असल्यामुळे, हा गुण त्याच्यातही आला का काय अशी मला शंका आली.

मग अचानक लक्षात आलं की शाळेत आठवीत असताना तो Drums वाजवायला शिकला होता. त्यानंतर काही दिवस त्यानी कुठेतरी क्लास लावला होता आणि आजकाल तबला आणि इतर काही वाद्येसुद्धा तो मित्रांबरोबर वाजवत होता. पण माझी अशी कल्पना होती की हे सगळं फक्तं अभ्यासातून विरंगुळा आणि छंद म्हणून चाललं होतं.

“व्यावसायिक वादक होणे हे काय CA होण्यापेक्षा सोपं आहे असं तुला वाटतं? तिथे तर जास्त स्पर्धा आहे. लाखांपैकी एखादाच वर येतो आणि नाव काढतो. त्यासाठी तर जास्त कष्ट करावे लागतील.”

“वादक होण्यासाठी मी दिवस-रात्र कष्ट करीन.” तो ठामपणे म्हणाला.

“अरे पण दोन वर्षापूर्वी तूच म्हणालास की तुला CA व्हायचंय. आम्ही कुठे जबरदस्ती केली होती तुला?”

“CA च्या अभ्यासात माझं लक्ष लागत नाही कारण माझं संगीतावर प्रेम आहे.”

“कोण ही संगीता?” मी रागावून विचारलं.

माझा सुपुत्र काहीही न बोलता उठून निघून गेला.

“अहो तुम्ही ना, नाही त्यावेळी नाही ते प्रश्न विचारण्यात अगदी पटाईत आहात बघा.” बायकोनी एका वाक्यात माझ्यावर सर्जिकल स्ट्राईक केला.

संगीत आणि संगीता या दोन्हीमध्ये मी गफलत केली होती हे माझ्या लक्षात आलं पण माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांचा एक प्रचंड मोर्चा मंत्रालयाकडे निघाला होता. एकतर मेंदूतल्या त्या कलकलाटात मला काहीही सुचत नव्हतं आणि दुसर म्हणजे मोर्चाचं स्वागत करणाऱ्या मंत्र्यांप्रमाणे मलादेखील एकाही प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं.

व्यावसायिक वादक? माझा स्वतचा मुलगा? डिग्री शिवाय? चांगली नोकरी न करता? किती ढोल आणि तबला बडवणार? त्याला काम मिळण्याइतकं छान वाजवता तरी येतं का? किती कमावणार? काय खाणार? कोण लग्न करणार त्याच्याशी? कोण भले लोक त्याला जावई करून घेणार? एकोणीस वर्षाच्या कार्ट्याला काय कळतं आयुष्याबद्दल? दोन वर्षांपूर्वी CA बनायचं होत, आता वादक बनायचंय आहे आणि पुन्हा दोन वर्षांनी अजून काही नवीन खूळ डोक्यात घुसलं तर काय करायचं? वाया गेलेला पैसा आणि वेळ कशी भरून काढणार? आणि तोवर जी अजून मुलं स्पर्धेत उतरतील त्यांच्यासमोर टिकणार का हा? बरं तबला आणि ढोल वगैरे तरी भारतीय वाद्यं आहेत पण हा वाजवणार Drums, पाश्चात्य संगीताबरोबर. संपूर्ण भारतात पाश्चात्त्य संगीत ऐकणारे आहेत तरी किती जण?

मी बायकोला म्हणालो, “डॉक्टर मोहन आगाशे एक थोर मानसोपचारतज्ज्ञ आहेत आणि त्यांनी आयुष्यभर नाटका-सिनेमांमधे कामं केली. दोन्हीही क्षेत्रात त्यांनी नाव कमावलं. आपल्या मुलाला CA करू दे. दिवसा नोकरी करेल आणि मोकळ्या वेळात वाजवू दे काय वाजवायचं ते.”

ती त्याच्या खोलीत जाऊन त्याच्याशी बोलून परत आली. अगदी मिनिटभरात. “तो काहीही ऐकायला तयार नाहीये. त्याला फक्त percussionist व्हायचं आहे. शेवटी मी त्याला सांगितलं कि आम्हाला विचार करायला एक आठवडा लागेल.”

संपूर्ण आठवडाभर हा मुलगा अत्यंत दुःखी चेहरा करुन घरात वावरत होता. तो मजनू आणि मी, त्याचा नसून, लैलाचा खडूस बाप असल्यासारखा तो माझ्याकडे खुनशी नजरेने बघत होता.

मी आठवडाभर सुट्टी घेतली आणि आम्ही घरातल्या ज्येष्ठांना आणि आमच्या मित्रांना सल्ले विचाराला सुरुवात केली.

आम्ही त्याच्या संगीत शिक्षकांकडे गेलो आणि त्यांच्यासमोर आमची व्यथा मांडली.

आपल्या दाढीचे खुंट खाजवत खूप विचार केल्यानंतर ते म्हणाले, “मला वाटतं या मुलामध्ये थोडीफार कला आहे आणि तो बऱ्यापैकी संगीतकार बनू शकेल, जर…”

‘थोडीफार कला’ आणि ‘बऱ्यापैकी संगीतकार’ हे ऐकूनच मला धडकी भरली आणि त्यावर या भल्या माणसानी ‘जर तर’ म्हणत आणखी अटी घालायला सुरुवात केली होती.

“जर काय?”

“जर त्यानी खूप कष्ट घेतले तर.”

कारटा खरच कष्ट घेईल का नाही हे सांगणं अशक्य होतं. पण त्या मास्तरांचं अजून संपलं नव्हतं.

“आणि जर त्याला उच्च प्रतीचा प्रशिक्षक मिळाला तर.” हि त्यांची दुसरी अट. म्हणजे फी वाढवून त्याला परत माझ्याकडे पाठवा असं त्यांचं म्हणणं होतं बहुतेक.

पण मी काही बोलायच्या आधीच त्यांनी त्यांचं स्वगत चालू ठेवलं. “आणि त्याला नशिबाने साथ दिली तर.”

म्हणजे आमच्या मुलाचं संपूर्ण करिअर आणि निम्मं आयुष्य यांच्या सांगण्यावरून वाया घालवायचं आणि शेवटी नशिबाने साथ दिली नाही म्हणून कपाळाला हात लावून बसून राहायचं? का, कधी, कुठे आणि कुणाला नशीब साथ देईल किंवा देणार नाही हे कोण सांगणार?

मग मी मुलाला बरोबर घेऊन एका नातेवाईकांना भेटलो. ते प्रतिष्ठित CA आहेत. मला खात्री होती की ते त्यांच्या व्यवसायाबद्दल खूप छान बोलतील आणि आमच्या मुलाचं मन वळवतील. पण ते म्हणाले, “करू द्या हो मुलांना पाहिजे ते. आजकाल पूर्वीसारखं कुठे राहिलंय?”

त्यांचं उत्तर ऐकून मी आश्चर्यचकित आणि निराश झालो. त्यानंतर खूप दिवसांनी मला असं कळलं की त्यांचा स्वतःचा मुलगा देखील CA बनायला तयार नव्हता, ‘आयत्या बिळावर नागोबा’ अशी परिस्थिती असूनही.

‘३ इडियट्स’ नावाच्या हिंदी सिनेमातलं एक दृश्य आपल्याला आठवत असेल. हे तीन मित्रं रात्री दारू पिऊन गप्पा मारत असताना रॅन्चो म्हणतो, “जर लता मंगेशकर ह्यांच्या वडिलांनी त्यांना म्हणलं असतं कि तू क्रिकेटर बन, किंवा सचिन तेंडूलकरांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं असतं कि तू गाणं म्हण, तर? कुठे असते हे दोघे जण आज?”

सिनेमा बघताना हे वाक्य अगदी तर्कशुद्ध वाटतं आणि मनाला सुखावून जातं, पण अनुभवावरून आपल्याला खात्री असते कि सिनेमाचा शेवट आनंदी आणि गोडच होणार आहे. हीच खात्री स्वत:च्या मुलाच्या भविष्या आणि आयुष्याबद्दल कशी देता येणार?

आमच्या मित्रांकडून मिळालेले सल्ले अस्पष्ट आणि विरोधाभासी होते. काही जण म्हणाले, कि करू द्या त्याला काय हवंय ते, पण बहुतेकांचं मत होतं कि उगाच नसत्या फंदात पडू नका. काहीजण तर चक्क हसत होते आमची परिस्थिती पाहून.

एका – वयानी आणि कर्तुत्वानी माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या – साहेबांनी सांगितलं, “उगाच भलते लाड करू नका मुलांचे. अनेक वर्षांपूर्वी माझाही मुलगा म्हणाला होता कि त्याला गिटार वादक व्हायचय. मी स्पष्ट सांगितलं, हि असली थेरं करायची असतील तर माझ्या घरातून बाहेर हो आधी. नाहीतर माझ्या सारखा इंजिनियर हो. त्यानी माझं म्हणणं ऐकलं आणि आज तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे.”

त्यांचा सल्ला ऐकून आम्हाला एक गोष्ट पटली, ती हि, कि कोणालाही सल्ला मागायला जायचं नाही! ‘ज्याचं जळतं त्याला कळतं’ म्हणतात ते उगाच नाही.

एका आठवड्यानंतर, मुलगा कॉलेजात असताना, आज काहीतरी निर्णय घ्यायचाच असं ठरवून बायको आणि मी दिवसभर वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत बसलो. रस्ता ओलांडण्यापासून, आज कुठली भाजी विकत घ्यायची, असले लहान मोठे अनेक निर्णय आपण कळत नकळत रोज घेत असतो. पण बहुतेक निर्णय घेण्याआधी, सद्य परिस्थितीची आपल्याला पूर्णपणे नसली तरी बरीच कल्पना असते. इथे पुढच्या पन्नास, साठ वर्षांसाठी निर्णय घ्यायचा होता आणि एकही अंदाज नक्की गृहीत धरण्यासारखा नव्हता. त्या दिवशी आम्ही दोघे इतके चिंताग्रस्त होऊन गढून गेलो कि जेवायला सुद्धा विसरलो.

पण शेवटी आम्ही निर्णयाला पोचलो.

पाचच्या सुमाराला मुलगा घरी आला. आम्ही आधी त्याला खायला दिलं आणि स्वत:ही घेतलं. मग त्याच्यासमोर आम्ही दोघं बसलो आणि त्याला सांगितलं, “तुला पाहिजे ते करियर कर तू.”

“काय?” मुलगा आश्चर्याने ओरडला.

“तुला नको असलेलं काम करून श्रीमंत पण दु:खी होण्यापेक्षा तू वादक होऊन गरीब राहिलास तरी आनंदी रहावास असं आम्हाला वाटतं.” आम्ही म्हणालो.

त्यानी झेप घेऊन आम्हा दोघांना कडकडून मिठी मारली.

मग त्यानी आनंदात आपली सगळी पुस्तकं वाटून टाकली आणि मुंबईला जाऊन काही संगीतकारांकडून अनौपचारिक रित्या शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

पण अधिकृत आणि औपचारिक पाश्चात्य संगीत शिक्षणासाठी परदेशी जाणं गरजेचं असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यानी एका युरोपिअन देशातील कॉलेजात अर्ज केला पण त्या देशानी त्याला व्हिसा नाकारला. त्या कॉलेजला एक ना एक दिवस त्या नकाराची खंत वाटेल अशी मला आशा आहे.

मग त्याला कॅनडा मधील काही संगीतकार भेटले आणि त्यांनी हंबर कॉलेजचं नाव सुचवलं. तिथे ऑडिशन वगैरे छान झाल्यावर त्याला प्रवेश मिळाला, त्या कॉलेजच्या ‘स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अँड परफॉर्मिंग आर्ट्स’ मधे जॅझ वादन शिकण्यासाठी.

आता एक नवीन समस्या निर्माण झाली. चार वर्षांच्या कोर्स साठी अफाट खर्च येणार होता. त्याला त्याची जाणीव होऊन वाईट वाटू लागलं. मग आम्ही त्याला समजावलं, कि मिळतील ती कामं करून, अभ्यास सांभाळून तू जमेल तेवढी कमाई कर आणि लागेल तेव्हा कर्ज काढून किंवा काही विकून आपण मार्ग काढत जाऊ. तरीही त्याला काळजी वाटत होती आपल्या आई वडिलांची.

“गरज पडली तर मी एक वेळचं जेवण सोडीन.” शेवटी मी त्याला सांगितलं. पण मी त्याला न सांगीतलेली गोष्ट अशी कि माझा वेगाने वाढणारा कमरेचा घेर पाहून माझ्या डॉक्टर मित्रानी एक नाही, तर दोन वेळचं जेवण बंद करायची सक्त ताकीद मला दिलेली होती!

त्याची जायची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी आम्हाला काळजी वाटू लागली. नवीन देशात नवीन जागी नवीन शिकण्यासाठी वेगळ्या वाटेवर निघालाय. यशस्वी होईल ना तो?

चिंतेमुळे माझी झोप उडाली, पण एकदा पाहटे उठून विचार करत बसलो असताना अचानक मला हि कविता स्फुरली.

धरून हात माझा…

धरून हात माझा बाळा, चार पावले चालशील ना?

स्वप्ने माझी सारी अधुरी, तू तरी पुरी करशील ना?

निश्चल जरी धनुष्य मी, स्वैर तीर हो तू माझा,

दाखवीन जर दिशा मी, तर दमाने तू उडशील ना?

कथा कलेला वेळ न गमला, जगण्याच्या दौडीत मला,

तुझ्या गाण्यांमध्ये कधी, गीत माझे गाशील ना?

प्रगतीविना गती माझी, घाण्याच्या बैलासमान,

मला न जमली मुक्त भरारी, तू तरी घेशील ना?

सर्व करुनी, जग जिंकूनही, पुन्हा परतून येशील ना?

अन धरून हात माझा बाळा, चार पावले चालशील ना?

हि कविता मी माझ्या घरात ऐकवली तर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. ज्याच्यासाठी लिहिली, तो फक्त, “कूल” एवढंच म्हणाला. त्यावर बायको म्हणाली, “कशाला अपेक्षांचं ओझं टाकताय त्याच्या डोक्यावर? आणि एवढी काही वाईट परिस्थिती नाहीये बरका तुमची. स्वप्ने सारी अधुरी म्हणे…”

त्याचा थोरला भाऊ, “हि पोएम फार इमोशनल आहे” एवढंच म्हणाला.

शेवटी कोणीतरी माझं कौतुक करावं म्हणून मी आमच्या एका नातेवाईकांना ती वाचून दाखवली, तर खूपवेळ विचार करून एक मोठा निःश्वास टाकून ते म्हणाले, “खूप डीप आहे!” म्हणजे, कवितेत मी काय म्हणालो हे त्यांना समजलं नाही आणि कवितेबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे हे मला कळालं नाही. त्यामुळे आमची दोघांचीही फिट्टम फाट झाली!

२०१५ साली त्याला मुंबईच्या विमानतळावर आम्ही सोडायला गेलो. त्याच्या सामानात काळजीपूर्वक बांधलेला तबला सुद्धा होता. त्याला सोडून परत येताना पुण्यापर्यंत आम्ही एकमेकांशी एकही शब्द बोलू शकलो नाही.

नुकतंच त्याचं तिथलं तिसरं वर्ष संपलं. परीक्षा म्हणून त्याला एक तासाभराचा कार्यक्रम सदर करावा लागला. त्यातला शेवटचा भाग हा आहे. निळा कुडता घालून जेंबे (Djembe) वाजवतोय तो आमचा मुलगा.

त्याला कॉलेजातून बाहेर पडायला अजूनही एक वर्ष आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा सरस संगीतकारांबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. आणि शेवटी भविष्यात काय होईल हे कोणालाही सांगता येणार नाही.

तरीही मला खात्री वाटतेय कि आम्ही अचूक निर्णय घेतलाय. तुम्हाला काय वाटतं?

ह्या व्हिडिओ मधे एक गोष्ट स्पष्ट दिसतेय, कि तो खूप आनंदी आहे.

त्याची आई आणि मी मरून जाऊन काळ लोटला असेल, पण तो ९९ वर्षांचा झाल्यावर आपल्या आयुष्याकडे जेव्हा मागे वळून बघेल, तेव्हा त्याला जाणवेल, कि वेगळ्या वाटेवर चालण्याचा आनंदही वेगळाच असतो.

© अविनाश चिकटे

https://www.facebook.com/AvinashChikte/

काल मी इंग्रजीत ‘The Difference’ हि पोस्ट ह्या ब्लॉगवर टाकली होती, त्याचा हा स्वैर अनुवाद, मातृभाषेत.

6 Comments

  1. खुपच छान. कु.आग्नेय चे मनःपूर्वकअभिनंदन व शुभेच्छा .

    Like

  2. “আমি বুঝতে পারছি না কিন্তু মনে হচ্ছে এটা মারাঠি ভাষায় … দুঃখিত”

    Like

Want to share a similar experience? Go ahead! Name & email are optional.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.