बकेट लिस्ट – आमचीही

बकेट लिस्ट नामक एक इंग्रजी सिनेमा अनेक वर्षांपूर्वी आम्ही पहिला होता. तो इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला समजला नाही.

बकेट लिस्ट नावाचा मराठी सिनेमा आम्ही नुकताच बघितला. तो मराठीत असूनही आम्हाला समजला नाही. सिनेमाच काय, आम्हाला तर त्याचं नाव देखील कळालं नाही.

‘Google Translate’ संकेतस्थळाला आम्ही ‘बकेट लिस्ट’ या शब्दांचा अर्थ विचारला असता त्याने ‘बादलीची यादी’ असे उत्तर दिले.

Bucket List Translation

करोडो रुपये पाण्यासाठीच पाण्यात घालवून वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण न झालेल्या आमच्या ‘महा’ राष्ट्रामधे बादलीची गरज सगळ्यांनाच पडते. परंतु यादी करण्याइतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बादल्यांची गरज आमच्या पुरातन – परंतु तरीही एकतर्फी – स्नेही, माधुरी दिक्षित, यांना का पडावी ह्या कुतुहलापाई आम्ही तो सिनेमा बघायला गेलो होतो.

‘बादलीची यादी’ हे उत्तर न पटल्यामुळे आम्हाला वाटलं की बहुतेक हा सिनेमा बनवणाऱ्यांना ‘बादलीतली यादी’ असं म्हणायचं असेल. तरीही आम्हाला कळेना की बादलीमध्ये पाण्याच्या ऐवजी यादी टाकायची तरी कशाला? आणि पाण्यामध्ये जर टाकायची तर ती यादी waterproof म्हणजे जलाभेद्य, ज्यातून पाणी शिरकाव करु शकत नाही, अशी असायला नको का?

आणि नुसतं सिनेमाचं नावच नाही, तर त्यातल्या अनेक गोष्टी आमच्या समजण्यापलीकडल्या होत्या.

एकतर चाळीस वर्षांच्या सुंदर, सडपातळ आणि धडधाकट महिलेवर अचानक हृदय प्रत्यारोपण (heart transplant) करायची वेळ का आली हे आम्हाला कोणीच सांगितलं नाही. त्यामुळे उगाच चाळीस वर्षानंतर घरातले सोफे जुने झाले म्हणून बदलून टाकावेत तसं त्यांनी हृदय बदलायचं ठरवलं का काय अशी शंका आम्हाला आली.

आमचा मनातल्या मनात एक प्रश्न. चाळीस वर्षांनंतर बायका आपापले नवरे देखील बदलतात का?

दुसरी शंका अशी कि पुण्याहून मलेशियाला ऑफिसच्या मिटिंगसाठी गेलेला मेहनती आणि शिस्तबद्ध नवरा, बायकोचा नवीन ड्रेस बघितल्यावर त्याच्या किमतीची चिंता न करता मिटिंग कॅन्सल करून बायकोबरोबर गाणी म्हणत हिंडायला जातो आणि तरीही नोकरीवरून काढून न टाकता त्याची कंपनी त्याला प्रमोशन देते. असं कसं?

आणि आमचा मनातल्या मनात आणखी एक प्रश्न. आमची कंपनी – आणि बायको – एवढी प्रेमळ कधी होणार?

हे प्रश्न आम्हाला सतावत असूनदेखील ‘डेव्हिडचे चिरंजीव हारले’ अशा अगम्य नावाची शक्तिशाली आणि महागडी मोटारसायकल (Harley Davidson), आम्हाला आयुष्यभर न सापडलेल्या मोकळ्या रस्त्यावर, ट्राफिक जाम मध्ये अडकलेल्या पुणेकरांप्रमाणे रडत खडत चालवूनही माधुरीबाई शर्यत जिंकल्या हे पाहून आमचा उर अभिमानाने भरून आला होता.

या मराठी लेखामध्ये आम्ही एवढे इंग्रजी शब्द का खुपसतोय हा जर प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल तर आमचे उत्तर हे की त्या सिनेमामधले पुण्यात राहणारे लोक इतकं इंग्रजी बोलत होते की हॉलिवूडमधल्या सिनेमात अधून मधून मराठी बोलायची पद्धत कशी सुरू झाली हा प्रश्न आम्हाला पडला होता. तीच सवय आता आम्हाला लागलेली दिसतीये.

माधुरीबाई – तुम्ही वयानी नसलात तरी कर्तुत्वानी श्रेष्ठ असल्यामुळे आदराने माधुरीबाई म्हणतोय – तर माधुरीबाई, वय सगळ्यांचंच होतं. तुमचंही झालं आणि आमचंही झालं. ते लपवायचा आम्ही काही (फारसा) प्रयत्न केला नाही आणि तुम्हीही करू नका. कशाला आपला देवानंद करून घ्यायचा? त्या साहेबांचा चिरतरुण दिसण्याचा अट्टाहास बघून शेवटी शेवटी त्यांचे निष्ठावंत देखील त्यांना ‘देव आनंद’ ऐवजी ‘देव दुःख’ म्हणू लागले होते असं ऐकलं.

अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे तुमच्या आणि आमच्या तरुणपणी, तुम्ही कॅमेऱ्याकडे बघुन प्रश्न विचारला होतात, “हम आपके है कौन?”

आमच्या स्वप्नाळलेल्या डोळ्यांत तुमचे सुंदर डोळे घालून तो प्रश्न तुम्ही आम्हालाच विचारला असा खुळा आणि गोड गैरसमज मनात घेऊन एका हातात त्या प्रश्नाचं उत्तर आणि दुसऱ्या हातात आमचं हृदय घेऊन आम्ही काही दिवस मजनूसारखे चंद्राकडे बघत फिरलो होतो.

जोरदार ठेच लागल्यावर खुळ उतरलं आणि आम्ही आमच्या अतिसामान्य आणि अज्ञात आयुष्यात पुन्हा हरवून गेलो.

आता आम्ही आणि आमचं हृदय, दोघंही जरा जुने झालोय, पण तुम्हाला कधी गरज पडली तर जिवंतपणे ते काढून द्यायला एका पायावर तयार उभे आहोत. ते काढल्यावर आम्ही उभे नसून आडवे असणार हे माहित असूनही. तुमच्या घरातच, अन त्यामुळे तुमच्यासाठी फुकटचे डॉक्टर असले तरी तुमच्यावर आणि आमच्यावरही तशी वेळ येवू नये अशी मनोमन प्रार्थना.

तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या (खऱ्या) वयोमानाप्रमाणे भूमिका करताना, रुपेरी पडद्यावर (म्हणजे तुम्ही पडद्यावर आणि आम्ही नेहेमीप्रमाणे अंधारात) पुढची अनेक वर्षे आपली भेट होत राहो अशी सदिच्छा.

एक महत्वाचं म्हणजे, तो सिनेमा बघून आम्हीही खास आमची स्वतःची बकेट लिस्ट बनवायला प्रेरित झालो आहोत. आमचा हा लेख वाचून त्या सिनेमाचे चाहते जर आम्हाला दगड मारायला आले तर डोकं वाचवायला हेल्मेट प्रमाणे डोक्यावर बकेट घेऊन त्या लोकांच्या नावाची लिस्ट करायचा आमचा मनसुबा आहे.

© अविनाश पां चिकटे

https://www.facebook.com/AvinashPChikte/

2 Comments

Comments are closed.