उन्नती

नाव ठेवणे आणि नावं ठेवणे ह्यात किती फरक आहे? म्हणलं तर खूप, अन पाहिलं तर काहीच नाही.

नावं ठेवणारे खूप पोटतिडकीने नावं ठेवतात, तरीही त्यात सत्य नसतं आणि बारशाला नाव ठेवणारे अत्यंत प्रेमाने अन आशेने बाळाचे नाव ठेवतात, पण त्यातही फार तथ्य नसतं. कारण, त्यानंतर कोणाच्या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा किती मेळ बसेल, हे सांगता येत नाही, आणि बहुतेकांचा तर बसतच नाही.

‘राम’ आणि ‘लक्ष्मण’ तुम्ही अनेक पहिले असतील, ‘रावण’ नावाचा कोणी बघितलाय कधी? बरं, ‘करण’ आणि ‘अर्जुन’ देखील खूप भेटतात, पण एखादा ‘दुर्योधन’ किंवा ‘दुस्शासन’ भेटलाय तुम्हाला? त्यानंतर ‘अशोक’ आणि ‘दिलीप’ हि नावं जेव्हा लोकप्रिय होती तेव्हा ‘प्राण’ नावाचा कोणी सापडला का कधी? आजकाल मात्र नायक आणि खलनायक ह्यांच्यातला फरक – सिनेमात आणि वास्तवातही – फारसा न राहिल्याने, नावांना काहीच अर्थ उरलेला नाही.

‘संग्राम’ नावाचा एक अत्यंत मिळमिळीत माणूस माझ्या ओळखीचा आहे आणि दुसरा एक किडकिडीत ‘बलराम’ मला माहिती आहे. एक ‘सत्यवान’ नावाचा माझा वर्गमित्र लहानपणापासूनच त्याच्या नावाला इतका जागला, कि मॅट्रिकला नापास झाल्यानंतर लगेचच त्यानी स्वतःला समाजसेवेत (हे त्याचे शब्द) म्हणजे राजकारणात झोकून घेतलं. चार वेळा पार्ट्या बदलल्या नसत्या तर आत्तापर्यंत मंत्री झाला असता बघा.

इतरांचं सोडा, माझं स्वतःचं नाव ‘अविनाश’ असलं तरी आयुष्यातल्या अनेक लहान मोठ्या लढायांमध्ये माझा विनाश झालेला आहे, आणि लग्नानंतर तर जरा जास्तच नियमितपणे होत आहे.

एकूण काय, चेहेरा चार इंच, लांबी चौदा इंच आणि वजन चार किलो असलेल्या बाळाचं नाव ठेवताना पुढच्या पन्नास वर्षांचा पोस्ट-डेटेड चेक वटण्याइतकीच त्या नावाची खात्री असते.

 

साहित्यिक बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या एका मित्रांनी आपल्या चिरंजीवाचं नाव ‘लेख’ ठेवलं. तोपर्यंत त्यांची ती एकमेव निर्मिती होती! पुढे नोकरी आणि पोटापाण्याच्या धडपडीत त्यांना लेखन कधीच जमलं नाही. पण स्वप्नं अजूनही थोडफार जिवंत होतं, म्हणून त्यांनी मुलाचं लग्न झाल्यावर उत्साहात सुनेचं नाव तिच्या मनाविरुद्ध बदलून ‘कादंबरी’ ठेवलं. कालांतराने, आपली नाराजी निमुटपणे व्यक्त करण्यासाठी असेल, तो ‘लेख’ तस्साच पाच पानी राहिला आणि ती ‘कादंबरी’ झाली पाचशे पानी!

 

पण नुकतीच आपल्या नावाला साजेसं जगणारी एक मुलगी मला भेटली. तिचं नाव आहे, ‘उन्नती.’

उन्नती म्हणजे प्रगती, उत्कर्ष, किंवा सुधारणा हे आपल्याला माहितीच आहे, पण तिनी ते कसं सार्थ केलय हे सांगतो.

मी काम करतो त्या एअरलाइन, म्हणजे विमान कंपनीमध्ये ती नुकतीच लागलीये, पायलट म्हणून. तिचं प्रशिक्षण चालू असताना कॅन्टीन मधे नाश्त्याच्या वेळेला आमची भेट झाली. माझ्या समोर तिची मैत्रीण बसली होती, जिला बघून ही आमच्या टेबलपाशी आली. औपचारिक ओळख करून घेताना तिनी नाव फक्त ‘उन्नती’ असं सांगितलं. मी माझं संपूर्ण नाव सांगीतल्यावर, मी महाराष्ट्रीयन आहे हे लगेचच उघड झालं.

“तुम्हीपण मराठी आहात का?” तिनी इंग्रजी सोडून मला मराठीत विचारलं.

“हो.”

“कुठले तुम्ही?”

“पुणे.”

“मी सांगलीची.”

“अरेच्चा! माझी सासुरवाडी मिरजेची.” मी सांगितलं.

“हो का? माझी आई मिरजेत बँकेत कामाला होती. तिच्या खूप ओळखी आहेत तिथे. काय नाव तुमच्या सासऱ्यांचं?”

आता माझीच दाढी अनेक वर्षांपासून पांढरी असल्याने, माझ्या सासऱ्यांचं नाव विचारणाऱ्या ह्या मुलीचा प्रश्न ऐकून मला हसू आवरेना.

हा प्रश्न दुसऱ्या कोणाकडून जरा वावगाच वाटला असता, पण तिच्याकडून तसा वाटला नाही, कारण तिचं वागणं आणि बोलणं अत्यंत विनयशील होतं, अन निरागस असूनही पोरकट नव्हतं.

मला हसताना बघून ती थोडी कावरीबावरी झाली आणि गप्पं बसली.

एकतर आमची पहिलीच भेट आणि माझं वय तिच्यापेक्षा दुप्पट. त्यावर मी प्रशिक्षक अन ती प्रशिक्षणार्थी. त्यामुळे ती जरा अवघडल्यासारखी दिसली, म्हणून विषय बदलण्यासाठी तिच्या हातातलं पाकीट बघून मी विचारलं, “हे काय खातीयेस?”

मी अनोळखी लोकांना असा एकेरीत सहसा संबोधत नाही, पण का कोण जाणे, हि मुलगी अनोळखी वाटलीच नाही.

तिनी त्या पाकिटातले शेंगदाणे एका थाळीत ओतले आणि आम्हाला देत म्हणाली, “आज उपास आहे माझा.”

शर्ट पँट घातलेली आणि व्यावसायिक वैमानिक असलेली हि मॉडर्न मुलगी, चक्कं उपास करतीये ह्याचं मला आश्चर्य वाटलं. इथे मी ऑमलेट खात होतो आणि तिची मैत्रीण चिकन सँडविच.

साधारण पंचविशीत असलेली, स्मितहास्य करत किंचित मान वाकवून बोलणारी, पुढे येणाऱ्या केसांच्या बटा सांभाळत एक एक करून शेंगादाणे खाणारी हि मुलगी मला कुतुहुलास्पद वाटली.

ती अजूनही हिरमुसलेली होती, म्हणून तिला बोलतं करण्यासाठी तिच्या गळ्यातील दागिना बघून मी उद्गारलो, “मंगळसूत्र!”

“हो, सर.”

आता मला ह्या मंगळसूत्र घालून, उपास करत, बोईंग विमान चालवायला शिकणाऱ्या मुलीचं कौतुक वाटायला लागलं.

“सासर सांगलीतच का?”

“नाही सर. मुंबईत.”

“काय नाव सासरचं?” माझ्या नकळत, मी तिचाच प्रश्न तिला विचारला.

“माहेरचं नाव ‘उन्नती प्रमोद कमलाकर’ आणि सासरचं, ‘उन्नती मंगेश सातपुते’. पण मी लग्नानंतर नाव बदललं नाहीये माझं, आणि बदलणारही नाहीये.”

 

लग्नानंतर नाव न बदललेल्या बऱ्याच मुली माझ्या माहितीत आहेत. काहीजणी लग्नाआधीपासून नोकरी व्यवसायात नाव कमावलेलं असल्याने, तर काहीजणी बँक, पासपोर्ट वगैरे ठिकाणी नाव बदलायची सरकारी भानगड नको म्हणून. हि कारणे मला पटतात. पण एक शहाणी अतिशय उर्मटपणे तिच्या घरच्यांना म्हणाली होती, “काय करायचं आडनाव बदलून? उद्या मी म्हणाले तर तो बदलणार आहे का त्याचं?” इतकं तुझं-माझं करणाऱ्या मुलीचं लग्न किती टिकणार ह्याची मला तेव्हाच चिंता वाटली होती. नंतर तिचा घटस्फोट झाला तेव्हा मला वाईट वाटलं, पण नवल वाटलं नाही.

हि मुलगी उद्धट वाटत नव्हती, पण तरीही निर्धाराने सांगत होती, “मी लग्नानंतर नाव बदललं नाहीये माझं, आणि बदलणारही नाहीये.”

त्यामुळे तिचं कारण काय असेल हे जाणून घेण्यासाठी मी तिला विचारलं, “का बरं?”

तिनी गंभीरपणे उत्तर दिलं, “माझ्या वडिलांचं लहानपणापासून स्वप्न होतं, वैमानिक बनायचं. पण खेडेगावात रहात असल्याने आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. म्हणून माझ्या पायलट लायसन्सवर त्यांचं नाव हवं होतं मला.”

“अरे व्वा! तुझ्या वडिलांना खूप गर्व वाटला असेल ते पाहून.”

“हो सर.”

“आता त्यांना तुझ्या विमानात घेऊन जा फिरायला एकदा. अतिशय आनंद होईल त्यांना.” मी उत्साहात हसत म्हणालो.

ती हसली नाही.

“नाही सर. ते काही वर्षांपूर्वी वारले.”

 

माझ्या अंगावर काटा आला ते ऐकून. स्वर्गवासी पित्याचं नाव नेटाने पुढे चालवणाऱ्या त्या तरुणीला, माझं वय आणि नोकरीतील वरिष्ठत्व आड आल्यामुळे, मी मनातल्या मनातच नमस्कार केला.

 

ह्यापुढे खाजगी आयुष्यात ती पत्नी, आई आणि काही दशकांनी आज्जी अशी रूपं बदलत जाईल. तसेच तिच्या व्यावसाईक आयुष्यात तिच्या कामाचे स्वरूप बदलत जाईल. आज ती प्रशिक्षणार्थी आहे, काही महिन्यांत फर्स्ट ऑफिसर बनेल, त्यानंतर ती कॅप्टन होईल आणि पुढे प्रशिक्षक देखील, पण तिच्या त्या भावूक निर्णयामुळे एक गोष्ट नक्की आहे. तिच्या पायलट लायसन्सवर अजरामर झालेले श्री प्रमोद कमलाकर, नेहेमीच तिचे को-पायलट असतील.

एक पिता ह्यापेक्षा जास्त काय मागू शकेल?

तिच्या ह्या विचारांचं श्रेय तिच्या इतकंच तिच्या पालकांना देखील द्यायला हवं. खेड्यातून आणि गरिबीतून वर येऊन आपल्या एका मुलीला पायलट आणि दुसरीला Ph. D. बनायला प्रोत्साहित करणाऱ्या तिच्या आईवडिलांचे कौतुक करावे तितके थोडे. आणि लग्नानंतर, तिच्या भावनांशी सहमत होऊन, नाव बदलण्याची सक्ती न करणारा तिचा जीवनसाथी आणि सासरची मंडळीही थोर.

 

घराण्याचं नाव चालवायला कुलदीपक, म्हणजे कितीही करंटा असला तरी कारटा हवा, म्हणून मुलगी नको म्हणत भृणहत्या करणाऱ्या महाभागांनो, काहीतरी शिका ह्यांच्याकडून. सुधरा, सुधारा, प्रगती करा.

करा आपलीही, ‘उन्नती!’

 

© अविनाश चिकटे

https://www.facebook.com/AvinashChikte/

हा लेख ‘उत्तम कथा’ मासिकाच्या मार्च २०२० अंकात प्रकाशित झाला आहे.

 

21 Comments

 1. जेव्हा सर्व पुरुष जात असा विचार करतील तेव्हाच “मुलगी शिकली – उन्नती झाली” असे म्हणता येईल.

  Like

 2. Sir, very well written . I know her and her family . Her father is from my native village Rui near Ichalkaranji .
  All the best to Unnati and her instructor . Regards .

  Like

 3. Sir very interesting article. तुमचे लेख वाचून दर वेळेस आयुष्यात काही ना काही इन्स्पिरेशन मिळते आणि खूप छान वाटते. खुप खुप धन्यवाद सर.

  Like

 4. उन्नती आवडली. संपूर्ण समाजाची प्रगती व्हावी असेच वाटते.
  मला एकूणच डेज् प्रकरण आवडत नाही. त्यातून महिला दिन तर मुळीच नाही. एकीकडे आम्ही पुरूषांच्या बरोबरीने सगळे करतो, त्यांच्या पेक्षा कमी नाही असे म्हणायचे. तर दुसरीकडे हा दिवस साजरा करून उगीचच कौतुक करून घ्यायचे. महिला खरोखरीच स्वतःला सक्षम समजत असतील तर प्रथम महिलादिन प्रकरण बंद केले पाहिजे.

  Like

 5. 👏👏👏
  छान.
  चुरचुरीत लेखातून ‘उन्नतीची’ भरारी वाचताना मजा आली.
  स्वातीलाही दाखवतो.
  कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

  Like

Want to share a similar experience? Go ahead! Name & email are optional.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.