एक (फेक) वात्रटिका
१४ ते २७ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे पासून मराठी दिनापर्यंत…
व्हॅलेंटाईन डेला, त्याच्या डार्लिंगला,
गुलाबाचा बुके, त्याने गिफ्ट केला.
शायनिंग करायला, लाँग राईड मारायला,
सिटीच्या बाहेर, तो तिला घेऊन गेला.
सुंदर सनसेटला, ठेवून साक्षीला,
बुशेसच्या मागे तो, तिच्यासंगे लपला.
सिनेमात पाहिलेले, गाणे त्याने सिंग केले,
आणि ट्यून मधे तिला, ‘लव्ह यू’ सांगितले.
बायसेप्स दाखवत, ‘आय मिस यू’ म्हणत,
त्याने किस मागितला, ओठांचा चंबू करत.
क्षणभर ती शहारली, मग मिस्टीरियसली,
मोनालिसा सारखी, गालातच हसली.
थोडं ब्लश करून, स्टाईलिशली वाकून,
पुढे केला डिम्पलड गाल, तिने डोळे झाकून.
तो फार सॅड झाला, पण तिला पटवायला,
फॅन्सी हॉटेलात, अर्जंटली घेऊन गेला.
खूप कॅन्डल लावल्या, रोमँटिक गप्पा मारल्या,
काजू, चिकन अन चार बीयर रिचवल्या.
तिच्या फोनची रिंग वाजली, पिकअप करून ती हळूच बोलली,
जेलस फ्रेंड्सचा होता म्हणत, पर्समधे ठेवत खुदकन हसली.
त्यांनी डिस्को डान्स केला, डिनर देखील छान झाला,
अन मनातल्या मनात त्याने, पुढचा प्लॅन आखला.
फादर तिचा पर्मनन्ट अँग्री, सडनली आला हॉटेलच्या दारी,
अन त्याला शिव्या देत तो, तिला घेऊन गेला घरी.
व्हॅलेंटाईन डेच्या सेलीब्रेशनला, तीन हजाराला चुना लागला,
तरीही हा हिरो आपला, बॅचलरच राहिला!
*****
वरील कविता मराठी आहे का इंग्रजी?
काही ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर सोपा आणि सोयीस्कर असला, तरी…
*****
कविता हि जरी, मिश्कील अन हसरी,
थोडीशी वात्रट, दिसे वरवरी.
तिच्या खोल अंतरी, दडलीये सारी,
माय मराठीची, कळकळ खरी.
शब्दांचा हा खेळ, त्यात इंग्रजी भेसळ,
साधत नाही त्यात, मराठीचा मेळ.
मराठी माउली, मृदू मायबोली,
हळूहळू ती आहे, लुप्त होत चालली.
इंग्रजी शिकूया, हिंदीतही बोलूया,
पण मराठीचे मोल, नको विसराया.
भाषा हि आपली, समृद्ध सजलेली,
मग इंग्रजीची कुबडी, तिला का लागली?
रोजच्या रोज करून, मराठीचा खून,
कसा करावा साजरा, मराठी भाषा दिन?
©अविनाश चिकटे
कविता वाचून तुमच्या मनात मराठीचे प्रेम (तात्पुरते का होईना 😊) जागृत झाले असेल, तर हि ‘लिंक’ बघा.
https://avinashchikte.com/chashme-buddu
https://avinashchikte.com/chashme-buddu
Heart photo from unsplash.com
अविनाश, राष्ट्रीय सुरक्षा संस्था येथे शिक्षण, भारतीय वायुदलामध्ये कामगिरी, त्यानंतर एका नामांकित कंपनीत वैमानिक या सर्व ठिकाणी मुख्यत्वे इंग्रजीचा वापर. क्वचित कधीतरी आपली राष्ट्रभाषा.
असे असूनसद्धा मराठीचा असा लीलया आणि अभिमानाने वापर करणे हे खरंच कौतुकास्पद. आपले मराठीचे प्रेम पाहून मराठीला चांगले दिवस येतील याची खात्री वाटते.
LikeLike
हलकीफुलकी वात्रटिका, छान वाटली. आणि मायमराठीबद्दलच्या गोष्टीही अगदी बरोबर मांडल्या आहेत. मराठी फक्त बोली भाषाच राहून जाते की काय असं वाटून जातं कधीतरी. तुमची ‘चष्मे बुद्दू’ वाचायला घेतलीय.
LikeLike
धन्यवाद. 🙏🙂
LikeLike
वाह अवि वाह! फारच सुरेख.
LikeLike
धन्यवाद, सर. 🙏🙂
LikeLike