fbpx

भुज – न भूतो न भविष्यति!

मी भारतीय हवाई सेनेत लढाऊ वैमानिक होतो आणि भुजमध्ये दोन कार्यकाळ केले आहेत. तब्बल पाच वर्षं त्या भागात उड्डाण केल्यामुळे, मी माझ्या वायूसेना आणि कच्छमधील आनंदी आठवणींना उजाळा देण्यास उत्सुक होतो.

पण हा चित्रपट बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं.

खरंच आलं.

पण हसून हसून पाणी आलं, कारण निर्माते इतके गंभीर असूनही हा चित्रपट हास्यास्पद निघाला.

सर्वप्रथम, भुजच्या विमानतळाचे कमांडर साहेब पार्टी करत असताना पाकिस्तानी वायूसेनेची विमानं येऊन विमानतळावर अनेक बॉम्ब टाकतात, आणि उघड्यावर उभ्या असलेल्या आपल्या विमानांवर गोळीबार करतात. मग, त्या सर्व नेत्रदीपक स्फोटांमधे अनेक आत्मघाती लोक जीव द्यायला निघाल्यासारखे वरखाली पळतात आणि स्वत:ला जखमी करून घेतात. त्या गोंधळात कमांडर साहेब पेटलेल्या जीपमधे बसून ती सुसाट चालवत एका जळणाऱ्या विमानात घुसवतात, आणि त्या आगीच्या वरून हवेत उडून, रस्त्यापेक्षा टणक असलेल्या धावपट्टीवर पडतात.

मला वाटलं, सुरवातीलाच हिरो गेला तर उरलेला सिनेमा फ्लॅश बॅक मधे दाखवणार का काय? पण हिरो कोण आहे हे मी क्षणभर विसरलो होतो. त्यांची हाडं रबराची आणि स्नायू स्टीलचे असल्याने, लगेचच एखाद्या सुंदर स्वप्नातून जागे झाल्यासारखे ते उठतात आणि कपाळावर एक छोटी जखम सोडली तर त्यांना काहीही झालेलं नसतं.  

मग ते विमानवेधी तोफ (anti-aircraft gun) चालवतात आणि अनेक पाकिस्तानी विमानं काही मिनिटांत पाडतात. त्यानंतर ते विमानतळाबाहेर जाऊन एका गुप्तहेरला पकडून मारतात आणि मग दूरध्वनीवर एका पाकिस्तानी कमांडरशी जीवघेण्या संवादांची देवाणघेवाण करतात.

हे सारे पहात असताना तोवर प्रेक्षकांच्या मनातही आत्महत्येचे विचार सुरु झालेले असतात, पण अजून त्यांचा पराक्रमी अत्याचार संपलेला नसतो.

त्या मोठमोठ्या बॉम्ब स्फोटांमधून मैलभर पळत – बॉम्बला घाबरून बोंब न मारता – एक भारतीय वैमानिक त्याच्या मिग-२१ विमानात चढतो आणि चंद्रापेक्षा जास्त खड्डे असलेल्या धावपट्टीवरून उड्डाण घेतो, देशाचे रक्षण करण्यासाठी. पण त्याच्या विमानावर रॉकेट आणि बॉम्ब लावलेले असतात, जे जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी असतात, जी गोष्ट त्याच्या आणि सिनेमा बनवणाऱ्या लोकांच्या लक्षातच येत नाही.

मग तो एक अशक्य अशी dog-fight, म्हणजे हवाई लढाई लढतो, आणि नुसत्या शब्दांनी ती जिंकता येत नसल्याने तो हारतो. त्याचं विमान समुद्रात जाऊन कोसळतं आणि अंगावर एकही जखम नसलेला आपला हा वैमानिक गोव्यातल्या एखाद्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर असल्यासारखा पाण्यातून चालत बाहेर येतो.

तो समुद्र म्हणजे कच्छचे रण आहे असे भासवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न अति निष्फळ ठरतो. ते रण मुंबईपासून दूर असले तरी त्याचे फोटो गुगलवर नक्कीच सापडले असते, शोधायचे कष्ट कोणी घेतले असते तर!

मग एक पाकिस्तानी पती घरी बसून रणनीतीवर चर्चा करतो, जी त्याची बायको, एक भारतीय गुप्तहेर, ऐकते, आणि त्याला जीवे मारून घरातून बाहेर पडते, त्याच्या रक्ताचा डाग कुंकवासारखा कपाळावर मिरवत. तेवढंच नाही तर ती त्यानंतर तिच्या नाजूक हातांनी असंख्य सैनिकांनाही ठार मारते.

त्यानंतर, भारतीय लष्करातील एक कर्नल साहेब, फक्त १२० सैनिक आणि एक पागी (वाटाड्या) यांना घेऊन पाक सैन्याचे १०० रणगाडे आणि १८०० सैनिकांना कच्छच्या सीमेवर रोखण्याची तयारी करत असतात. पण हे अशक्य असे काम ते कसे करणार? चिंता नका करू, त्यांच्याकडे एक भन्नाट, न भूतो न भविष्यती अशी युक्ती आहे, जी आजपर्यंत कोणाला सुचली नाही, यापुढे सुचणार नाही आणि – तुमचीही लवकरच खात्री होईल – कोणाला सुचूही नये.

कर्नल साहेब म्हणतात, “आपण पेट्रोल भरलेल्या बाटल्या हवेत फेकू आणि त्या बाटल्यांवर गोळीबार करू.”

हे केल्यानी ते कसे जिंकणार? त्यांची हि सर्कस पाहून जर शत्रूचे सैनिक हसून हसून पोट दुखल्याने आडवे पडले तरच!

पण त्यांना कोणीही विचारत नाही, कि तुम्ही फेकलेली बाटली किती दूर जाणार? जर तुमच्याकडे गाड्या नाहीत तर पेट्रोल आलं कुठून? आणि इतक्या रिकाम्या बाटल्या? आपण काय ऐन युध्दात सीमेवर मेजवानी झोडायला गेला होतात का?

मग त्या पागीच्या सल्ल्यानुसार, कर्नल साहेब तिथल्या खाडीवर धरण बांधतात, एका रात्रीत!

महाराष्ट्रात त्यांना पाटबंधारे मंत्री म्हणून आमंत्रित करण्याची विनंती आम्ही आपल्या उप-मुख्यमंत्री साहेबांना करायचं ठरवून टाकलं, हा सिनेमा पूर्ण पहिल्या नंतरही जर डोकं शाबूत राहिलं तर.

त्यानंतर ते साहेब धरण उध्वस्त करून अर्ध्या हल्लेखोरांना पुरात बुडवून मारतात. त्यावर आपले पागी दादा उर्वरित पाकी सैनिकांना, विद्युत जाळी घेऊन मच्छर मारल्यासारखे, फक्त कुऱ्हाड घेऊन मारतात. शेकडो पाकिस्तानी सैनिक त्यांच्या चारी बाजूला असूनही अति विनम्रपणे त्यांना एक गोळी देखील मारत नाहीत!

का भाऊ, का?

मग आपल्याला एक कच्छी बाई भेटतात. त्या आपल्या लेकराला एका बगलेत पकडून दुसऱ्या हाताने कोयत्याचा वार करत सहजपणे एका बिबट्याला ठार मारतात, तो बिबट्या जंगलातून नव्हे तर संगणकातून आलेला असल्याने. म्हणजे कम्प्युटर ग्राफिक्सची कमाल, जी सिंहगडावर सुरु झाली, ‘तान्हाजी’ मधे.  

त्यांनंतर त्या बाईसाहेब एक देश प्रेमाचं गाणं म्हणतात आणि मग आणखी काही महिलांना घेऊन धावपट्टी दुरुस्त करण्यासाठी वायुसेनेच्या बेसवर जातात. त्या धावपट्टीवर एक प्रचंड खड्डा पडलेले असतो, पाकिस्तानी विमानांनी टाकलेल्या बॉम्बमुळे – त्या बॉम्बचा स्फोट झाला नसूनही!

आणि घरातून निघण्यापूर्वी, त्या बाई खड्डा भरण्यासाठी डबर पाहिजे म्हणून स्वतःचे घर देखील तोडतात! ते पाहून माझ्या हृदयाचे सुद्धा तुकडे झाले, आणि मी तेही मनातल्या मनात त्या खड्ड्याला वाहिले.

मग त्या स्त्रिया धावपट्टीची दुरुस्ती करतात, PWD, म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागापेक्षा शंभर पट वेगाने. आणि मग त्या बुजवलेल्या खड्डयावर आपले कमांडर साहेब, आणि त्यांच्या पत्नी देखील, रोड-रोलर चालवतात!

राजनीती आणि सरकारी कामातला सापत्नीक सहभाग आजकाल नविन नसला तरी त्याकाळी सुरु झालेला पाहून आमचे आश्चर्याने विस्फारलेले डोळे भरून आले तेव्हा शिमिटावर पाणी मारण्यासाठी आमच्या अश्रूंचा सुद्धा उपयोग होऊ शकेल अशी सूचना आमच्या पत्नीने फोडणीत मिरची टाकत केली.

तेवढ्यात ‘रडीचा डाव’ खेळत आणखी एक पाकी विमान येऊन अजून एक बॉम्ब टाकतं आणि दुसरा खड्डा तयार होतो, जो ते सगळे ताबडतोब दुरुस्त करतात, ‘चा-पाणी’ देखील न मागता.

हे चालू असतानाच आपला पायलट मित्र भुज विमानतळाच्या वरती हवेत विमानाच्या घिरट्या घालत असतो.

हा तोच वैमानिक आहे जो मिग-२१ क्रॅश झाल्यानंतरही समुद्रातून ‘और भी नमकीन’ झालेल्या नायिके सारखा बाहेर पडला होता; जो युध्दात शहीद झालेल्या मित्राच्या आईचे सांत्वन करण्यासाठी पंजाबला जाऊन आला; ज्याने एका गुप्तहेराला डोक्यावर सोड्याची बाटली मारून पकडले, तो सोडा रममध्ये टाकण्याऐवजी पूर्णपणे वाया घालवत; आणि जो आता मिग-२१ हे छोटे लढाऊ विमान सोडून मोठे, मालवाहू विमान उडवायला शिकला आहे, जणूकाही एका विमानानंतर दुसरे वेगळे विमान चालवणे, म्हणजे आज मारुती चालवल्यानंतर उद्या इंडिका चालवण्याइतकेच सोपे आहे!

आणि हा एकटा पायलट हिरो एवढं सगळं करताना बघून माझ्या डोक्यात शंका आली, त्या वेळी संपूर्ण वायुसेनेत फक्त एकच पायलट होता का?

पण जामनगर विमानतळावर त्याला अडवायला आपले वाहतूक पोलीस नसल्यामुळे, त्याने विमानात भरमसाट सैनिक घुसवले होते, आणि टेक-ऑफ करताना त्याच्या विमानाचे पुढचे चाक तुटून पडले होते.

मग आपले सर्वशक्तिमान बेस कमांडर साहेब रनवेवर ट्रक चालवतात आणि हा पायलट विमानाचा पुढचा भाग ट्रकवर अलगद विसावत लँडिंग करतो. गेल्या वर्षी इंटरनेटवर दिसलेल्या बनावट व्हिडिओवरून कॉपी केलेला हा स्टंट अत्यंत खुळा आहे.

बरीच आदळ आपट झाल्यानंतर ते विमान शेवटी थांबते आणि त्यात उभे असलेले – आईशप्पत, टेक-ऑफ पासून आत्तापर्यंत उभेच असलेले – ४५० सैनिक उतरतात, आणि सीमेकडे रवाना होतात.

परंतु तोपर्यंत कर्नल साहेबांच्या बाटल्यांना घाबरून पाकिस्तानी रणगाडे कधीच घरी गेलेले असतात.

शेवटी, आटपाट नगराची हि कहाणी संपते आणि सगळे जण आनंदात असतात. सगळे जण – फक्त प्रेक्षक सोडून, जे एकतर हा सगळा खेळ पाहून हसत असतात किंवा दोन चांगले तास वाया गेले म्हणून दु:खी असतात.

आपण चित्रपट निर्मात्याला काही दृश्ये नाट्यमय करण्यासाठी ‘कलात्मक परवाना’ नक्कीच देऊ शकतो, पण ‘इतिहास’ म्हणत इतका कल्पनाविलास?

हा चित्रपट दाखवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मने हा चित्रपट ७ आणि त्यावरील वयोगटांसाठी योग्य म्हणून घोषित केला आहे. मला वाटतं हा चित्रपट ७ आणि त्याखालील वयोगटांसाठी योग्य आहे, कारण केवळ ६ वर्षांची बालकेच ह्याचा आनंद घेऊ शकतील.

जर तुम्हाला फक्त त्या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यात स्वारस्य असेल तर तुम्ही तुमचे दोन तास वाचवल्याबद्दल माझे आभार मानून आता जाऊ शकता.

पण जर तुम्हाला वायुसेना आणि भुज बद्दलचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर पुढे वाचा.

होय, माधापर गावच्या धाडसी स्त्रिया खरंच विमानतळावर आल्या होत्या आणि त्यांनी धावपट्टी दुरुस्त करण्यास मदत केली होती.

होय, स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक हे १९७१ च्या युद्धापूर्वी आणि युद्धा दरम्यान भुज एअरबेसचे  कमांडर होते.

होय, १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये कै. रणछोडदास पागी यांनी आपल्या सैन्यासाठी वाटाड्या (स्काउट) म्हणून काम केले होते.

सिनेमात ह्या तीनच गोष्टी बरोबर आहेत.

आणि खालील गोष्टी बरोबर नाहीयेत.

नाही, हल्ला झाला त्या रात्री कमांडर साहेब पार्टीमधे, गाणे गात नृत्य करत नव्हते. आपले सशस्त्र सैन्यदल कित्येक महिन्यांपासून हाय अलर्टवर होते. भुज विमानतळ हे त्या काळी एक फॉरवर्ड बेस होते, ज्याला C&MU – केअर अँड मेंटेनन्स युनिट – म्हटले जायचे. युद्धात पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या आपल्या विमानांसाठी इंधन भरणे वगैरे आणि परतणाऱ्या विमानांना तत्काळ लँडिंग करायची गरज लागल्यास आपत्कालीन सुविधा पुरवणे हे तिथल्या लोकांचे काम होते. भारतीय वायुसेनेने भुजपासून १०० किलोमीटर दक्षिणेस असलेल्या जामनगर विमानतळावरून  सर्व हवाई हल्ले केले होते.

नाही, ह्या चित्रपटात वारंवार सांगितल्याप्रमाणे कच्छमध्ये ५०% पाणी आणि ५०% वाळवंट नाहीये. ते ऐकून मला ‘शोले’ मधील जेलर असरानींची आठवण आली, जे म्हणाले होते, “आधे इधर, आधे उधर, और बाकी हमारे साथ आओ!” मग कच्छमधे लोकांना राहण्यासाठी ‘बाकी’ जमीन कोठे आहे?

नाही, चित्रपटात म्हणल्याप्रमाणे कच्छ हे एक बेट नाहीये, जे पाकिस्तान फक्त तीन पूल तोडून भारतापासून वेगळे करू शकेल.

नाही, शत्रूला सहज जमिनीवर नष्ट करण्यासाठी आपली मौल्यवान विमाने युद्धकाळात कोणी उघड्यावर उभी करत नाही. लढाऊ विमाने, लढाईच्या तयारीत, ‘ब्लास्ट पेन’ म्हणतात त्या मजबूत कॉंक्रिटच्या बिळासारख्या इमारतीत लपवून ठेवत असतात. आणि मोठी वाहतूक विमाने सीमेपासून दूरवरच्या विमानतळांवर असतात.

नाही, वैमानिकांना त्यांच्या लढाऊ विमानांपर्यंत पोहोचण्यासाठी मॅरेथॉन धावण्याची गरज नसते. ते जवळच बंकरमध्ये बसतात.

नाही, स्टेशन कमांडर साहेब स्वत: विमानभेदी तोफा चालवत नाहीत. त्यासाठी निष्णात सैनिक असतात. तसेच ते हेरांशी लढत नाहीत किंवा रोड-रोलर चालवत नाहीत.

नाही, रॉकेट आणि बॉम्ब लावलेले विमान हवाई संरक्षणासाठी (Air Defence) नव्हे तर जमिनीवर हल्ला करण्यासाठी असते.

नाही, जेव्हा हल्ला होतो तेव्हा आम्ही सैरावैरा पळत नाही. आम्ही आपला जीव आणि शस्त्रे नंतर वापरण्यासाठी जतन करतो.

नाही, हवाई लढाईत (aerial combat) शत्रूकडे डोळे वटारत टक लावून पाहण्याचा वेळ आणि संधी मिळत नाही. पहिल्या महायुद्धाच्या मंदगती विमानांमधून ते शक्य झाले असेल, १९१७ साली, पण १९७१ मधे नक्कीच नाही.

नाही, सीमेपलीकडील धोकादायक मोहिमांमध्ये आईच्या गुडघ्याच्या ऑपरेशनसारख्या गोष्टींवर कोणीही चर्चा करत नाही.

नाही, गुजराथ मधल्या जामनगरहून पंजाबमधील एका गावात मित्राच्या आईचे सांत्वन करण्यासाठी फक्त दोन आठवडे चाललेल्या युध्दात तुम्ही कोणाला पाठवू शकत नाही. या बाबी युद्ध संपल्यानंतर केल्या जातात.

नाही, १९७१ साली भुज ते पाकिस्तान फोनवर बोलणे शक्य नव्हते. त्या काळी मुंबईहून दिल्लीला देखील मुश्किलीने ट्रंक-कॉल लागायचा.

नाही, सोनाराने मंगळसूत्रात मणी ओवण्या इतक्या अचूकतेने बॉम्ब टाकणे १९७१ मधे कोणालाही शक्य नव्हते. भुजमधेही पाकिस्तान वायुसेनेने टाकलेले ९०% बॉम्ब विमानतळाच्या बाहेरच पडले.

नाही, भारतीय वायुसेनेत ४५० सैनिक वाहून नेण्याइतके मोठे वाहतूक विमान नव्हते. आणि तुम्ही प्रवाशांना उभे करून विमानात जागा निर्माण करू शकत नाही. उभे पाशिंजर न्यायला हि काय येष्टी बस हाय का?

नाही, एक वायुसेना अधिकारी – अगदी युद्धात सुद्धा – त्याचा टाय छातीवर लोंबकळवत हिंडणार नाही कारण तो त्याच्या गणवेशाचा अनादर होईल.

नाही, भारतीय वायुसेनेत १९७१ साली निळा गणवेश नव्हता. उन्हाळ्यात त्यांचा खाकी गणवेश असायचा, आणि हिवाळी गणवेश घालण्यासारखी थंडी भुज मधे डिसेंबर महिन्यात देखील पडत नाही.

नाही, विषय संशोधन आणि तर्कशुद्ध मांडणी यांची कमतरता कम्प्युटर ग्राफिक्स आणि स्पेशल इफेक्ट्स वापरून भरून काढता येत नाही.

नाही, तज्ञ सल्लागारांशिवाय असले ‘ऐतिहासिक’ युध्दपट कोणीही बनवू नये.

नाही! नाही!! नाही!!!

©अविनाश चिकटे

लेखकांची पुस्तके पाहण्यासाठी कृपया खाली स्क्रोल करा.

फोटो भारतीय वायूसेनेच्या सौजन्याने.
वरचा फोटो भारतीय वायू सेनेने १९७१ च्या युध्दात हल्ला केल्यानंतर केलेले ढाका विमानतळाचे हवाई छायाचित्रण आहे.
दुसरा फोटो माधापरच्या धाडसी महिलांचा आहे, धावपट्टीची दुरुस्ती करताना.

माझ्या इंग्रजी ब्लॉगचे मराठी भाषांतर करण्याची सक्तीपूर्वक विनंती केल्याबद्दल मी माझे मित्र श्री अरविंद परांजपे आणि कर्नल आनंद बापट यांचे आभार मानतो.

नाही, (पुन्हा एकदा!) ह्या कर्नल साहेबांचा त्या वरच्या कर्नल साहेबांशी काहीही संबध नाही.

4 thoughts on “भुज – न भूतो न भविष्यति!”

  1. Awesome description! Such idiot directors should be spanked publicly for atrocities on public. 😉

  2. Vinayak Deodhar

    वाह उस्ताद वाह! तू येवढ्या रसाळ पणे उत्कंठा शिगेला पोहोचवणारे वर्णन केले आहेस की आता हा चित्रपट केंव्हा एकदा पाहतो असे वाटू लागले आहे. 😜😜.

Leave a Reply

You cannot copy content.

%d bloggers like this: