fbpx

सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम

१४ नोव्हेंबर २०२१ रोजी, सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांच्या वाढदिवसा निमित्त हा लेख महाराष्ट्र टाईम्स मधे प्रकाशित झाला होता.

मागच्याच आठवड्यात एका महान दानशूर व्यक्तीला विमानात भेटण्याचे सौभाग्य मला लाभले आणि त्या भेटीबद्दलचा माझा लेख, ‘मीटिंग अझीम प्रेमजी: ए क्लास अपार्ट इन कॅटल-क्लास’ बराच लोकप्रिय झाला.

दुसरं एखादं थोर व्यक्तिमत्व पुन्हा कधी आणि कसं भेटणार असा मी विचार करत असतानाच आणखी एक व्यक्ती माझ्या विमानात – आणि आयुष्यात – आली, ह्याच आठवड्यात मी दिल्ली-पुणे फ्लाइटचा वैमानिक असताना.

आम्ही, माझी सह-वैमानिक आणि मी मिळून, उड्डाणपूर्व तयारी आणि चेकलिस्ट वेळेत पूर्ण केल्या होत्या. पॅसेंजर बोर्डिंगही पूर्ण झाले होते, आणि उरल्या होत्या फक्त काही कागदपत्रांवर माझ्या सह्या.

होय, आम्हा वैमानिकांनाही कागदपत्रे हाताळावी लागतात. एका बुद्धिमान वृद्ध वैमानिकाने एकदा म्हटले होते, “विमान तेव्हाच उडू शकेल जेव्हा कागदपत्राचे वजन विमानाच्या वजनाइतके होईल!”

तेव्हा वरिष्ठ कॅबिन क्रू (Senior Cabin Crew – SCC) तिच्या ब्रीफिंगसाठी कॉकपिट मध्ये आली. आम्ही तिला फ्लाइटमध्ये अपेक्षित हवामान आणि इतर परिस्थितींबद्दल माहिती दिल्यानंतर ती म्हणाली, “कॅप्टन, आज आपल्या विमानात एक खास व्यक्ती आहे.” हे बोलताना तिचे डोळे चमकत होते.

“कोण आहे?” मी सभ्यपणे विचारलं, फारश्या कुतूहलामुळे नाही, तर तिच्या उत्साहावर पाणी टाकायचं नाही म्हणून.

अनुभवावरून मला माहिती आहे की या तरुण मुली ज्या लोकांना हीरो समजतात ते लोक, मी साठ पावसाळे पाहिलेला एक माजी सैनिक असल्याने, मला फारसे थोर वाटत नाहीत. तसाही मी फ्लाइटच्या आधी कोणत्याही प्रवाशांना भेटत नाही, कारण वेळ कमी असतो आणि काम खूप असतं. आमचं काम जरा जोखमीचं असल्यामुळे गप्पा मारत कामातील एकाग्रता कमी होऊ देणं चालण्यासारखं नसतं.

आणि खरं म्हणजे प्रवाशांच्या नावांची यादी जरी केबिन क्रू कडे असली, तरी त्यात मी कधी लक्ष घालत नाही कारण ते माझे काम नव्हे. माझे काम माझ्या प्रवाशांना सुरक्षितपणे आणि वेळेवर पोचवणे हे आहे आणि शेवटी माझ्यासाठी प्रत्येक प्रवासी हा खासच आहे!

पण जेव्हा त्या मुलीने त्या व्यक्तीचे नाव सांगितले तेव्हा मात्र मी पूर्वी कधीही न केलेले गोष्ट केली. मी चटकन उठून उभा राहिलो आणि कॉकपिट मधून बाहेर जाऊन सोळाव्या रांगेत बसलेल्या त्या व्यक्तीला भेटायला गेलो. माझ्या फ्लाइट मध्ये बऱ्याच वेळा नटनट्या आणि आयपीएल क्रिकेट टीम असताना देखील मी हे कधी केलं नव्हतं.

बरेच प्रवासी कॅप्टनला विमानाच्या मध्ये चालत येताना बघून आश्चर्याने माझ्याकडे टक लावून पाहात होते.

मी त्या खास व्यक्तीपाशी गेलो, हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि विमानामध्ये त्यांचे स्वागत केले.

त्यांनीही मला हसून नमस्कार केला.

त्यांच्या आसपास बसलेले प्रवासी कुतूहल आणि अविश्वासाने माझ्याकडे बघत होते, आणि त्या लोकांच्या चेहेऱ्यांवरून त्यांनी न विचारलेले प्रश्न स्पष्ट दिसत होते.

“कोण VIP आहेत ह्या बाई?”
“कॅप्टन स्वतः त्यांना भेटायला का आले आहेत?”
“ते नातेवाईक आहेत का?”

त्या बाई माझ्या नात्यातल्या नाहीयेत, आणि मी त्यांना यापूर्वी कधीही भेटलेलो नाही, परंतु मी त्यांच्या थोर कार्याबद्दल ऐकले आणि वाचले आहे. त्या राजकारणी नेत्या नाहीयेत, आणि सिनेस्टार किंवा सेलिब्रिटी नाहीयेत. एक सौम्य आणि सुंदर स्मितहास्य एवढाच त्यांचा मेकअप आहे.

त्या बाई म्हणजे सिंधुताई सपकाळ, ज्यांना प्रेमाने माई म्हणतात, कारण त्यांनी हजारो अनाथांना वाढवून एक नवीन जीवनदान दिले आहे.

एका अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुलगा हवा असताना मुलगी झाली म्हणून द्वेषाने त्यांना सगळे ‘चिंधी’ म्हणायचे. चिंधी म्हणजे एक फाटलेल्या कापडाचा निरुपयोगी तुकडा हे आपल्या सर्वांना माहितच आहे. त्यावरुन त्या पोरीला तिच्या घरात किती प्रेम मिळत असेल याचा अंदाज आपल्याला करता येईल.

त्या केवळ बारा वर्षांच्या असताना त्यांचं लग्न लावून देण्यात आलं, एका बत्तीस वर्षांच्या माणसाशी. आठ वर्षांनंतर, त्या चवथ्या वेळेला गरोदर असताना, काही गैरसमज झाल्याने त्यांच्या पतीने जवळजवळ बेशुद्ध होईपर्यंत त्यांना बेदम मारहाण केली, आणि त्यांना घराबाहेर काढलं.

केवळ वीस वर्षांच्या त्या बाईने आपल्या मुलीला एका गोठ्यात जन्म दिला. त्यावेळी तिच्या बरोबर होत्या फक्त काही गाई.

अन्नाच्या तुकड्यांसाठी मंदिरे आणि स्मशानभूमीत देखील फिरल्या त्या. आणि त्यानंतर अनेक रात्री त्यांनी स्मशानभूमीत घालवल्या, कारण त्यांना भुतांपेक्षा, मानवी रूपातल्या श्वापदांची भीती जास्त होती.

त्यांनी जितकं दुःख सहन केलं त्यातील एक टक्का देखील सहन करायला लागलं तरी बरेच जण आत्महत्या किंवा खून करायला उभे राहतील. पण त्यांनी तसं काहीच केलं नाही.

रेल्वे फलाटावर भीक मागताना इतर अनाथ मुलं जेव्हा त्यांना भुकेली दिसली तेव्हा त्यांनी आपली भाकरी त्या मुलांना खाऊ घातली. इथूनच त्यांची कामगिरी सुरू झाली आणि त्यानंतर त्यांनी हजारो निष्पाप बालकांना जीवनदान दिलं. लहानपणी आणि तारुण्यात त्यांना प्रेम हे फारसं मिळालंच नाही तरीही त्यांनी निरागसपणे सर्वांना वाटलं. म्हणूनच माई मला शुद्ध, निःस्वार्थ आणि बिनशर्त प्रेमाचे प्रतिक वाटतात.

आपल्या पोटापाण्याच्या गरजेपेक्षा जास्त कमाई करता येणं हे बऱ्यापैकी अवघड आहे. आपल्या कष्टाच्या कमाईचा मोठा भाग दुसऱ्यांना देऊन टाकणं हे त्याहीपेक्षा कठीण आहे. पण जेव्हा स्वतःलाच पुरेसे अन्न मिळत नाही तेव्हा त्यातला तुकडा इतरांना देणं? हे अतिशय महान आहे.

अंगावरचं लुगडं आणि कडेवरची कन्या ह्या व्यतिरिक्त फक्त खंबीर मन आणि प्रेमळ हृदय घेऊन सुरुवात करून त्या आता हजारो अनाथांची माई झाल्या आहेत. हा प्रेरणादायी प्रवास एक गोष्ट सिद्ध करतो. “आपला जन्म कुठे आणि कशा परिस्थितीत होतो, हे आपल्या हातात नाही. त्यावर आयुष्यात आपल्याला काय सोसावं लागेल ह्याची कधीही खात्री नसते. पण त्यानंतर आपण काय करतो आणि कसे वागतो ह्यावर आपलं भविष्य ठरतं.”

मानवी वर्तनाची सर्वात खालची पातळी पाहिली असूनही त्या कधी तशा वागल्या नाहीत. त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागला आहे, तरीही त्या नेहमी हसत असतात. गरिबीमुळे त्या चौथीच्या पुढे शाळेत जाऊ शकल्या नाहीत, पण त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या बेवारस मुलांना वाढवून, शिक्षण देऊन, त्यांना डॉक्टर, वकील आणि इतर कामे करणारे जबाबदार नागरिक बनवलं आहे. माई भेटल्या नसत्या तर त्यांच्यातली बरीच मुलं कदाचित गुन्हेगारीकडे वळली असती किंवा कुपोषणाने आणि आजाराने लहानपणीच वारली असती.

त्यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे ‘मी सिंधुताई सपकाळ.’ या चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्यांची ओळख विमानात त्यांच्या शेजारी बसलेल्या एका वैमानिकाशी होते. ते ‘वैमानिक’ खरं म्हणजे त्या सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन होते. मला त्यांचा हेवा वाटतो कारण त्यांना माईंना बरेच वेळा भेटायची संधी मिळाली.

तीव्र तपश्चर्या, ध्यान, किंवा समर्पण केल्यानंतर, काही मानव सामान्य अस्तित्वाच्या सीमा ओलांडतात आणि असामान्य बनतात. माई आता त्या टप्प्यावर पोचल्या आहेत हे त्यांना भेटताच आपल्याला लक्षात येतं.

जेव्हा आमचं विमान ३६००० फुट उंचीवर स्थिरावलं आणि फ्लाइटशी संबंधित सर्व कामे आम्ही पूर्ण केली, तेव्हा मी नेहमीच्या घोषणांसाठी मायक्रोफोन उचलला. पण आज माई बरोबर असल्याने ही एक सामान्य फ्लाइट नव्हती, म्हणून मी हिंदीत बोलत एक वेगळी घोषणा केली.

मी म्हणालो, “मी आपला कॅप्टन, फ्लाइट डेक मधून बोलत आहे. नेहमी प्रमाणे, मी तुम्हाला आता माझे नाव किंवा कॅबिन क्रू ची नावे सांगणार नाही, कारण माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी एक मोठे नाव आहे. आज आपल्या बरोबर पद्मश्री पुरस्कार विजेत्या श्रीमती सिंधुताई सपकाळ प्रवास करत आहेत. त्यांच्या उपस्थितीने आपल्याला सन्मानित केले आहे.” त्यानंतर मी लोकांना माईंच्या कामाबद्दल थोडक्यात सांगितलं आणि म्हणालो, ‘आता कृपया टाळ्या वाजवून आपण आपली कृतज्ञता दाखवूया.’

त्यानंतर SCC ने मला कळवले की त्यांचे नाव ऐकून सर्व प्रवाशांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या आणि मी त्यांना विनंती केल्यावर पुन्हा एकदा.

आम्ही पुण्यात लँडिंग केल्यानंतर, दुसऱ्यांदा मी यापूर्वी कधीही न केलेली गोष्ट केली. मी सह-वैमानिक, कॅबिन क्रू तसेच ग्राउंड स्टाफवर दादागिरी करून माईंचा हात धरून त्यांना व्हीलचेअरपर्यंत पोचवण्याचा मान मिळवला.

त्यांच्या हस्त स्पर्शाने माझ्या अंगात चैतन्य संचारल्याचा मला भास झाला आणि रस्त्यावर सापडलेल्या बेघर बालकांना माईंच्या परिस स्पर्शाने काय होत असेल ह्याची मला जाणीव झाली. त्यांच्या आश्रमात केवळ काही दिवसांचे वय असलेल्या बाळांपासून ऐंशी वर्षांचे वृद्ध देखील आहेत. ते सगळेच त्यांच्या सहवासाला आतुर असतात ह्यात काहीच नवल नाही.

अझिम प्रेमजी आणि माई, एक अब्जाधीश धनवान उद्योगपती आणि दुसरी निर्धन माता. वरवर अतिशय वेगळे दिसत असले तरी दोघेही आपापल्या पद्धतीने विलक्षण आहेत. दोघेही इतरांसाठी सर्वकाही त्यागणारे, प्रसिद्धी आणि ग्लॅमरपासून दूर राहणारे समाजसेवक. माणसाच्या दृष्टीने ते वेगळे दिसत असले तरी माणुसकीच्या मापात ते समान भरतील.

दोन आठवड्यात दोन महान व्यक्तींना भेटण्याचे भाग्य देवाने मला बहाल केले. आभारी आहे देवा, आणि तुम्हालाही धन्यवाद माई. तुम्ही देवापेक्षा फार वेगळ्या नाही आहात.

रुडयार्ड किपलिंगने म्हणाला आहे, ‘देव सर्वत्र असू शकत नाही म्हणूनच त्याने आई घडवली.’

त्यांच्याबरोबर विमानातून चालत येत असताना त्यांची नऊवारी साडी बघून मी त्यांना सांगितलं की माझी आई देखील नऊवारी साडी नेसायची. ते ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला.

जेव्हा आम्ही फोटोसाठी विमानाबाहेर थांबलो, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमाने माझा हात धरला, अगदी माझी आई धरायची तस्साच.

एक मुलगा आपल्या आईला भेटल्यावर काय करेल? वाकून नमस्कार करेल. हो ना?

आसपास उभे असलेले लोक, माझा हुद्दा आणि गणवेश वगैरे सगळं विसरून, मीही केला!

हे घडलं १० नोव्हेंबरला. ११ तारखेला इतर कामातून वेळ काढून मी त्यांच्यावर इंग्रजीत लेख लिहिला. प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांची अनुमती मागण्यासाठी तो लेख मी त्यांच्या मुलाला पाठवला १२ तारखेला. माझी अपेक्षा होती की एकदोन दिवसांत त्यांची संमती मिळेल, पण केवळ पंधरा मिनिटांत त्यांच्या मुलाचा मला फोन आला. “माईंना तुमच्याशी बोलायचं आहे.”

घरात बसलेला मी आदराने उभा राहिलो, माई बोलणार म्हणून! “नमस्कार माई. लेख आवडला का?”

त्या म्हणाल्या, “मला हुंदका आला रे बाळा! आता तुझं नाव मी ‘नऊवारीचं लेकरू’ असं ठेवलं आहे. छान लिहिलं आहेस तू, पण माझ्यासाठी मराठीत कधी लिहिणार?”

माझे केस गेल्या पंधरा वर्षापासून पांढरे असले तरीही माईंना मी बाळ दिसतोय ह्याचं मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. त्यांना सगळे जण बाळच दिसतात कारण त्यांच्या मायेनी ओथंबलेल्या निरागस जीवाला, प्रत्येकातलं बाळ दिसतं.

“लवकरच लिहीन, माई.” मी म्हणालो.

तो इंग्रजी लेख प्रकाशित झाल्यानंतर निवांतपणे भाषांतर करायचा माझा विचार होता पण अचानक मला कळलं की १४ नोव्हेम्बरला त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे काल मध्यरात्रीपर्यंत जागून हा लेख मी पूर्ण केला, माझ्या माईला तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून.

त्या स्वतः अनाथ आणि बेघर होत्या, पण त्यांनी १५०० हून अधिक मुला-मुलींना आश्रय दिला. एके काळी त्यांचे कोणीही नातेवाईक नव्हते, कारण त्यांच्या आईसह सगळ्यांनी त्यांना नाकारलं होतं. आता त्यांना स्वतःच्या मुलांव्यतिरिक्त शेकडो जावई आणि सुना आहेत, आणि हजारो नातवंडे आहेत.

अशा या माईंच्या वाढदिवसाला केवळ योगायोगाने ‘बालदिन’ म्हटले जावे ही खरंच आनंदाची बाब आहे.

हॅप्पी बर्थडे सुपरमॉम!

——————————————————————————————————————–

काही क्षणच का होईना, पण माईंचा परीसस्पर्श लाभला हे माझं सौभाग्य.

पण एका गोष्टीचा मात्र मला पश्चात्ताप वाटतो. हा लेख वाचल्यानंतर माईंनी मला सपत्नीक आमंत्रित केलं होतं त्यांच्या आश्रमात.

‘सावकाश जाऊ’ म्हणत आम्ही ते पुढे ढकललं आणि आता मात्र उशीर झाला.

खरंच, फारच उशीर झाला.

©अविनाश चिकटे

Link to the article in English: A Rendezvous With The Supermom – Padma Shri Sindhutai Sapkal


8 thoughts on “सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम”

  1. निशब्द
    धन्यवाद कमांडर चिकटे.
    आपण व आपल्या विमान आणि प्रवासीवर्गाची प्रत्येक सॉर्टि थ्री पॉईंट लॅंडिंग करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे.

  2. Brig HS Ratnaparkhi

    खूप छान लिहिलंय – अविनाश. सिंधुताई एक आदर्श होत्या.

Leave a Reply

You cannot copy content.

%d bloggers like this: