fbpx

भारी आहे, ‘बाईपण भारी देवा’

काल अचानक सुट्टी मिळाली आणि बायको माझा कान धरून – नाही, अगदी कान नाही – हात धरून, हा सिनेमा बघायला घेऊन गेली.

आधी आम्हाला सिनेमाचं नावच कळेना. बाईपण भारी? का बाई पण भारी?

पोस्टर बघितल्यावर लक्षात आलं, की ‘लहानपण देगा देवा’ च्या चालीवर ‘बाईपण भारी देवा’ हे नाव असावं. पण असा फक्त आमचा अंदाज आहे, कारण अजूनही आमच्या मनात खात्री नाहीये.

असं आमचं बाकी अनेक सिनेमांच्या बाबतीत झालेलं आहे. एक मराठी सिनेमा होता ‘बकेट लिस्ट.’ त्या नावाचा अर्थ, म्हणजे मराठी अर्थ, आम्हाला कळला नव्हता. तसाच एक हिंदी सिनेमा होता ‘थक्षक.’ त्या काळी गुगल नव्हतं त्यामुळे थक्षक चा अर्थ शोधत आम्ही थकून गेलो आणि नाद सोडून दिला. तसंच एका इंग्रजी सिनेमाचं. वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट (One Flew Over the Cuckoo’s Nest) म्हणजे एखाद्या छोट्या रेल्वे स्टेशनवर न थांबता सुसाट जाणाऱ्या डेक्कन क्वीन प्रमाणे कोण कोणाच्या घरट्यावरनं का उडत गेला हे कळलंच नाही.

तसेही आम्हाला इंग्रजी सिनेमे उपशीर्षक म्हणजे सबटायटल लावून देखील फारसे कळत नाहीत ही गोष्ट वेगळी.

ह्या सिनेमाची सुरुवात छान झाली, पण लवकरच पात्रांची एवढी गर्दी झाली की मुंबईत एखाद्या फलाटावर एका मागे एक बदलते चेहरे सतत बघितल्यावर एकही आठवत नाही तशी आमची स्थिती झाली. कलाकार सगळे दिग्गज असले तरी इतके होते की आमच्या डोक्यात हिशोब काही लागेना.

सिनेमातल्या नायिका आहेत सहा काकडे भगिनी. पितामह तीर्थरुप काकडे, यांनी जर मोजले असते आकडे, किंवा कथाकारांनी तिघी-चौघीच दाखवल्या असत्या तर आमच्या डोक्यातला गोंधळ जरा तरी कमी झाला असता.

तर त्या सहा जणी आणि त्यांचे प्रत्येकी दोन जण जरी धरले तरी साधारण दीड डझनाचा हा हिशोब आहे. त्यामुळे ही कोण, आणि हिचा तिच्याशी काय नक्की संबंध, असं अधून मधून आम्ही बायकोला विचारायचा प्रयत्न केला, पण शेवटी आमच्या समोरच्या खुर्चीतली बाईपण, म्हणजे बाई पण, सारखी वळून माझ्याकडे हा कोण आणि किती बोलतोय अशा चेहऱ्याने बघू लागली तेव्हा मात्र मी गप्प बसलो.

छायाचित्रकाराने, ज्याला आजकाल मराठीत फोटोग्राफर म्हणतात, किंवा भाऊ कदम साहेबांनी अजरामर केलेले पात्र ज्याला डीओपी म्हणायचे, फारच क्लोज अप शॉट घेतल्यामुळे ती सगळी थोर मंडळी अगदी अंगावर आल्यासारखी वाटायला लागली. त्यामुळे कधी कधी जरा अति झालेला मेकअप डोळ्यात खुपू लागला.

नाही, आम्ही पहिल्या रांगेत बसलेलो नव्हतो.

सिनेमाने जम बसवायला थोडा वेळ घेतला. त्यामुळे मध्यंतरात चक्क उठून घरी जावं असा विचार आमच्या मनात आला, पण मॉल मधल्या हॉलमध्ये जवळजवळ एक सहस्त्र रुपये मोजले असल्यामुळे थोडी कळ काढून पैसे वसूल करावे असा ठराव बायकोने मांडला आणि एकमताने मंजूर केला. एकमताने म्हणजे एक मताने, म्हणजे एकाच मताने, कारण आमचं मत कोणी मागत नाही आणि मोजतही नाही. असो.

पण थांबलो हे चांगलं झालं कारण सिनेमा मध्यंतरानंतर हळूहळू फुलू लागला. मुख्य पात्रांची जरा बऱ्यापैकी ओळख झाली असल्यामुळे त्यांचा मेळ एकमेकाला लागायला लागला, त्यांच्या भूतकाळातील अनुभवांचा सद्य परिस्थितीतील भावनांशी असलेला नाजूक गुंता उलगडायला लागला, आणि आम्हाला सिनेमा आवडायला लागला.

प्रत्येक नायिकेची आपापली खाजगी रहस्य, प्रत्येकीच्या चिंता, काळज्या, जळफळ आणि जळजळ आपल्याला जवळून बघायला आणि अनुभवायला मिळते आणि नकळत आपण त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायला लागतो.

कथेत हृदयस्पर्शी क्षण अनेक आहेत आणि हसायला लावणारे प्रसंग देखील आहेत. विनोद कमी असले तरी ते वायफळ आणि किळसवाणे नक्कीच नाहीत.

सिनेमातल्या दोन गोष्टी मात्र आम्हाला खटकल्या.

सहा भगिनींपैकी एकीच्या सासरेबुवांचं वय तिच्या मानाने जरा कमीच वाटत होतं. जसं फक्त केस काळे केल्याने कोणी तरुण वाटत नाही तसं नुसते पांढरे केल्याने देखील वयस्कर वाटत नाहीत. अनेक दशकांपूर्वी बच्चन आणि संजीव कुमार तसं करायचे ते चालायचं, पण आजकाल तंत्रज्ञान बऱ्यापैकी सुधारलं आहे आणि प्रेक्षकही जागरूक झाले आहेत.

आणि एकीची सून, जी सिनेमाभर हिच्याबरोबर होती, ती शेवटी एकदमच गायब झाली. हिंदी सिनेमात करतात तसं तिच्या फोटोला हार लावून ठेवायचं त्या बिचारीचं वय देखील नाही त्यामुळे आम्ही उगाच चिंतेत पडलो.

एकूण हा सिनेमा चांगला आहे, पण सुरुवातीस थोडा दम मात्र धरायला लागेल. तेवढं सहन केलंत की सिनेमा संपल्यानंतर त्यातल्या नायिकांची आठवण नक्कीच येईल, त्यांची नावं आठवली नाहीत तरीही.

तब्बल अर्धा डझन आहेत हो!

©अविनाश चिकटे  

13 thoughts on “भारी आहे, ‘बाईपण भारी देवा’”

 1. झक्कास
  खुमासदार ,नेहेमीप्रमाणे विनोदी.

 2. विनोदी ढंगाचे परीक्षण आवडले. मला हा सिनेमा बघायची तशीही इच्छा नव्हती. हजार रूपये घालवून तर निश्चितच बघणार नाही 😜

 3. Vinayak Deodhar

  वाह वाह क्या बात है!! फारच खुमासदार शैलीत या चित्रपटाचे रहस्य उलगडले आहे. 💐💐

  1. shrinitin2007

   नेहमी प्रमाणे खुसखुशीत व नर्म विनोदी लेखन… आवडले…

    1. कसे काय सुचते रे तुला ,बायको बदल लिहायला ,पण खूपच छान आणि ओघवते लिहितोस,लई भारी,,!!!

Leave a Reply

You cannot copy content.

%d bloggers like this: