ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली, पण ह्यातील नायकाचा आज वाढदिवस आहे म्हणून आज हा लेख मराठीत अनुवादित करतोय.
त्या दिवशी, नेहमीप्रमाणे माझ्या एअरलाइनच्या कॉकपिट मध्ये बसायच्या ऐवजी, मला दुसऱ्या एअरलाइनच्या विमानात प्रवासी म्हणून जाण्याची संधी मिळाली. विमानातच बसायचं तर मला कॉकपिटमध्ये बसायला मला जास्त आवडतं, कारण ते चाळीस हजार फुटावरचं माझं ऑफिस आहे. हे ऑफिस अत्याधुनिक अन शांत आहे, आणि खिडकीतून दिसणारे दृश्य तर अगदी अप्रतिम!

पण पृथ्वीवरच्या गोंधळ आणि कलकलाटा पासून दूर मिळणारी ही निःशब्द शांतता कधी छान वाटते तर कधी कंटाळवाणी.
एक को-पायलट आणि अधून मधून भेटणाऱ्या परिचारिका सोडल्या तर तिथे बोलायला कोणीच नसतं. असतात ते फक्त रेडिओवरचे बिन चेहऱ्याचे कंट्रोलर्सचे आवाज.
म्हणून, जेव्हा मी पॅसेंजर केबिनमध्ये गणवेशात प्रवास करतो, तेव्हा मला इतर प्रवाशांशी गप्पा मारायला आवडतात, कारण त्यांना विमानाबद्दल आणि माझ्या कामा बाबत अनेक शंका असतात.
मला विशेषत: लहान मुलांचे अनपेक्षित आणि चाणाक्ष प्रश्न ऐकून आनंद होतो.
“काका, तुमच्याकडे विमानात हॉर्न आहे का? कोणी समोर आले तर काय करता तुम्ही?”
“रात्री घरी जाताना तुम्ही विमानाच्या दारांना कुलूप कुठे लावता?”
“तुम्ही कधी विमानातून उडी मारली आहे का?”
“विमान चालवताना तुम्हाला भीती वाटते का?”
त्यांना उत्तरं दिल्यानंतर मी त्या मुला-मुलींना नेहमी विचारतो, “तुला पायलट व्हायचे आहे का?”
आणि ते सर्वजण गोड हसत “होय” असे उत्तर देतात.
मग मी म्हणतो, “त्यासाठी, तुला खूप अभ्यास करावा लागेल, चालेल?”
आणि मग, मुले हसणे थांबवतात आणि त्यांचे पालक हसायला लागतात!
ती फ्लाईट पहाटेची होती. माझ्या शेजाऱ्याने विमान हवेत उडता क्षणी घोरायला सुरुवात केली आणि मी कानात बोळे घालून माझ्या वाचनात व्यस्त झालो.
जेव्हा मला जाणवले की विमान लँडिंगसाठी उतरू लागले आहे, तेव्हा मी माझ्या वाचनातून वर पाहिले तर पहिल्या रांगेतील एक गृहस्थ सावकाश उठून वॉशरूमकडे जात असल्याचे दिसले. पुढे जाण्याआधी ते वळून शेजाऱ्याला काहीतरी म्हणाले. तेव्हा कोव्हिडची लाट असल्याने त्यांनी मास्क घातलेला होता, तरीही फोटोत पाहिलेले त्यांचे मागे वळवलेले चंदेरी केस आणि नम्र, प्रेमळ स्मितहास्य बघून मी त्यांना लगेच ओळखलं. ते तर साक्षात श्रीमान अझीम प्रेमजी होते!
त्यांना तुमच्या-आमच्या प्रमाणे प्रवास करताना बघून मला खूप आश्चर्य वाटलं.
आपण रिक्षा किंवा टॅक्सी घेतो तसे ते एखादं विमान भाड्याने घेऊ शकले असते.
त्यांना स्वतःचे खाजगी विमान देखील सहज विकत घेता आले असते.
हे साहेब एक विमानच काय तर शेकडो विमानांची स्वतःची एअरलाइन ऊभी करू शकले असते, पण तरीही ते अगदी साधेपणाने इकॉनॉमी क्लास मध्ये बसले होते.
त्यावेळेस नुकतीच वाचलेली एक बातमी मला आठवली. लोककल्याणासाठी सढळ हाताने देणारे ते भारतातील सर्वोच्च देणगीदार आहेत. त्यांनी एका वर्षात तब्बल ९७१३ कोटी रुपये दान केले होते. म्हणजे दिवसाला २७ कोटी रुपये!
आता, माझी वरवर चांगली पगाराची नोकरी असूनही मला या आयुष्यात २७ कोटी रुपये कधीच दिसणार नाहीत.
काहीही गवगवा ना करता, प्रसिद्धीची हाव ना ठेवता, परोपकार करणारे हे थोर दानशूर साहेब चक्क स्वतःच्या आरामासाठी स्वतःवर पैसे खर्च करत नव्हते आणि ९७१३ कोटी रुपये एका वर्षात अनोळखी गरजू लोकांसाठी देत होते.
त्यांना बघून बँकांचं करोडोंचं कर्ज बुडवून, आपल्या कंपन्या गुंडाळून, तिथल्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून परदेशी पळून गेलेल्या महाभागांची मला आठवण आली आणि ह्या माणसाचा मोठेपणा प्रकर्षाने जाणवला.
मी जर कधी विप्रोच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलो, तर सुरक्षा कर्मचारी मला आत देखील जाऊ देणार नाहीत. आणि खुद्द अझीम प्रेमजी साहेबांची भेट? ती तर अशक्यच.
पण इथे आम्ही सहप्रवासी होतो आणि किमान त्या क्षणासाठी (जवळजवळ) एकसमान होतो.
आणि मला माझ्या गणवेशात असण्याचा एक फायदा झाला, तो असा कि मला त्यांना जाऊन भेटण्याचे धैर्य आले.
माझा गणवेश पाहिल्यावर त्यांनी त्यांचे नेहेमीचे स्मितहास्य केले, आणि मी म्हणालो, “सर, मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय.”
ते पुन्हा एखाद्या संतासारखे शांतपणे हसले आणि माझ्याशी हस्तांदोलन करून आपल्या जागेवर बसले.
लँडिंग झाल्यानंतर मी फ्लाइटच्या कॅप्टनचा निरोप घेतला, आणि बॅगेज बेल्टपाशी त्यांना पुन्हा जवळून बघण्यासाठी वेगाने निघालो.
त्यांच्या सोबत काही लोक होते, पण प्रेमजीं साहेब इतर प्रवाशांसारखे कोपऱ्यात उभे होते, आपल्या बॅगची वाट पाहत.
त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षक, चेले, चाहते वगैरे कोणीही नव्हते.
अब्जावधी डॉलर्सच्या बहु-औद्योगिक साम्राज्याचा सम्राट, एका सामान्य माणसासारखा उभा होता.
किती हा विलक्षण, असामान्य माणूस!
मी त्यांच्या जवळ जाऊन विचारलं, “सर, मी तुमच्यासोबत एक फोटो काढला तर चालेल का?”
ते हसले आणि म्हणाले, “मी तुमच्यासाठी माझा मास्क काढतो.” आणि त्यांनी आपला मास्क काढला. पण त्यांच्यासोबत असलेली एक महिला, जिने फोटो काढण्यासाठी माझा मोबाईल घेतला होता, त्यांना प्रेमळपणे दरडावून म्हणाली, “कृपया तुमचा मास्क घाला.”
आणि त्यांनी घाईघाईने मास्क परत चेहेऱ्यावर चढवला.

त्याक्षणी एखाद्या लहान मुलासारखे ते इतके निरागस दिसत होते की मी त्यांच्या साधेपणाने मंत्रमुग्ध झालो, आणि मला बा. भ. बोरकरांची कविता आठवली:
दिव्यत्वाची जेथ प्रचीती
तेथे कर माझे जुळती
जेव्हा हे लिहिण्यासाठी मी त्यांचा फोटो वापरण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांनी हसून होकार दिला.
धन्यवाद प्रेमजी साहेब. तुम्ही खऱ्या अर्थाने प्रेमळ आणि परोपकारी आहात.
आयुष्यभर तुम्ही जगाला आणि आपल्या देशाला खूप काही दिले आहे. आणि काही क्षणांतच तुम्ही मला नम्रतेचा एक अमूल्य धडा दिला आहे.
त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ शकणार?
मी तुम्हाला विनम्र अभिवादन करतो, आणि आज जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
©अविनाश चिकटे
हा लेख इंग्रजीमधे प्रथम प्रसिद्ध झाला होता, येथे: https://www.indiatimes.com/news/india/azim-premji-business-tycoon-and-philanthropist-553014.html
Cockpit image by DCstudio on Freepik