fbpx

भारतीय वायूसेनेच्या वर्धापन दिनाचा इतिहास  

भारतीय वायुसेना दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करते, पण त्यांनी ही तारीख का निवडली असेल?

तुम्हाला माहिती आहे का की वायुसेना पूर्वी वेगळ्याच तारखेला हा दिवस साजरा करायची? शोधायला जाऊ नका. तुम्हाला ती माहिती ऑनलाइन सहजासहजी मिळणार नाही.

या पोस्टच्या शेवटी मी उत्तर सांगीन, परंतु त्यापूर्वी ह्या लेखातच आपण ते शोधू शकता का पहा.

ब्रिटीशांचे धोरण होते की त्यांचे सैनिक भारतीय अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणार नाहीत. त्यामुळे भारतीय तरुण कितीही पात्र असले तरी ते सशस्त्र दलात अधिकारी होऊ शकत नव्हते.

पहिल्या महायुद्धाच्या (1914-1918) सुरुवातीस रॉयल एअर फोर्स (RAF) बाल्यावस्थेत होती आणि तिला रॉयल फ्लाइंग कोर (RFC) म्हटले जात असे.

त्या काळी युद्धात सक्रिय असलेल्या लढाऊ वैमानिकाचे सरासरी आयुर्मान जेमतेम सहा आठवडे होते, आणि म्हणूनच रॉयल फ्लाइंग कोर मधे वैमानिकांची नितांत गरज होती.

तरीही, जेव्हा पहिले भारतीय, हरदित सिंग मलिक, स्वेच्छेने सामील झाले तेव्हा त्यांना नकार देण्यात आला.

दुसऱ्या प्रयत्नात काही मोठ्या लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना ‘तात्पुरते’ आणि ‘मानद’ कमिशन देऊन अधिकारी बनवण्यात आले.

त्यानंतर आणखी काही भारतीय वैमानिक बनले आणि त्यांनी प्रशासनीय कामगिरी केली.

तरीही, विमान उडवणे आणि त्याची देखभाल करणे हे भारतीयांना जमेल असं ब्रिटिश सत्याधार्‍यांनी कधी मान्य केलं नाही. त्यामुळे भारतीयांना हवेत उडण्याचे आणि लढण्याचे प्रशिक्षण देण्यास ब्रिटिश उत्सुक नव्हते, आणि १९१८ नंतर काहीही प्रगती झाली नाही.

परंतु राष्ट्रवादी भारतीयांच्या वाढत्या दबावामुळे ब्रिटीश राज्यकर्त्यांना सशस्त्र दलातल्या अधिकारी वर्गाचे ‘भारतीयीकरण’ करण्यास भाग पडले आणि त्यांनी लेफ्टनंट जनरल सर अँड्र्यू स्कीन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली.

१ एप्रिल १९२७ रोजी स्कीन समितीने आपला अहवाल सादर केला, ज्यात निवडक भारतीयांना भावी भारतीय वायुसेनेचे अधिकारी म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी क्रॅनवेल येथील रॉयल एअर फोर्स कॉलेजमध्ये पाठवण्याची शिफारस केली होती.

पहिले सहा भारतीय कॅडेट सप्टेंबर १९३० मध्ये मध्ये प्रशिक्षणासाठी क्रॅनवेल येथे दाखल झाले. ते होते सुब्रोतो मुखर्जी, एच सी सरकार, भूपेंद्र सिंग, ऐझाद अवान, अमरजीत सिंग आणि जे एन टंडन.

परंतु जे एन टंडन यांना वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य ठरवण्यात आले, कारण ४ फूट आणि १० इंच उंची असल्याने ते विमान चालवण्यासाठी अपात्र ठरले.

जर तुम्ही विचार करत असाल की विमान चालवायला उंची कशाला लागते, तर मी तुम्हाला सांगतो, विमानाच्या कॉकपिटमध्ये ते खूप महत्त्वाचे आहे.

विमान चालवताना एका हाताने जॉयस्टिक, दुसऱ्या हाताने थ्रॉटल, आणि दोन्ही पायांनी रडर (rudder) हलवावे लागतात. जर पाय पोचलेच नाहीत रडर पर्यंत, तर विमान उडवणार कसं?

उर्वरित पाच जण लढाऊ वैमानिक झाले आणि त्यांना भारतीय वायु सेनेचे अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

शनिवार, ८ ऑक्टोबर १९३२ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड विलिंग्डन यांनी संमती दिली आणि भारतीय वायुसेना कायदा लागू करण्यात आला.

लवकरच भारतीय वायुसेनेचे नंबर १ स्क्वॉड्रन, १ एप्रिल १९३३ रोजी स्थापन झाले. त्यांच्याकडे होती ४ वापिटी नावाची विमाने, ६ वैमानिक आणि १९ भारतीय ‘हवाई शिपाई’.

आपल्या भारतीय वैमानिक आणि हवाई शिपायांना अनेकदा इंग्रजांकडून उपहास आणि भेदभावाचा सामना करावा लागला, परंतु कठोर परिश्रम करून आम्ही ब्रिटिश लोकांपेक्षा कुठेही कमी नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

दुसऱ्या महायुद्धातील उत्कृष्ट कामगिरीनंतर, ब्रिटीश राजवटीने “धन्यवाद” म्हणण्यासाठी त्यांच्या रॉयल एअर फोर्स RAF (Royal Air Force) सारखंच सन्मानित करत भारतीय वायुसेनेला RIAF म्हणजे रॉयल इंडियन एअर फोर्स (Royal Indian Air Force) म्हणायला सुरुवात केली.

२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक बनल्यानंतर, “धन्यवाद” म्हणत ‘रॉयल’ ही उपाधी काढून टाकण्याची आपली पाळी होती!

१ एप्रिल १९५४ रोजी, पहिल्या पाच अधिकाऱ्यांपैकी एक असलेले एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी भारतीय वायुसेनेचे प्रथम भारतीय कमांडर-इन-चीफ बनले.

तेव्हाच IAF मधील ‘I’ खऱ्या अर्थाने इंडियन, म्हणजे भारतीय झाला.

अनेक वर्षानंतर, जेव्हा मी बांगलादेशातील स्टाफ कॉलेजमध्ये वर्षभरासाठी गेलो होतो, तेव्हा बांगलादेश एअर फोर्स (BAF) मधला माझा स्थानिक मित्र मला गंमतीने म्हणाला, “१९४७ मध्ये, IAF मधल्या ‘I’ च्या वरच्या बाजूला अर्ध-वर्तुळ जोडून पाकिस्तानी लोकांनी I चा P करून PAF केला, आणि १९७१ साली आम्ही त्याखाली दुसरे अर्धवर्तुळ जोडून, P चा B करून, BAF बनलो!”

अर्थातच, ते त्यांचे वायुसेना दिन वेगवेगळ्या तारखांना साजरे करतात.

PAF वाले ७ सप्टेंबर रोजी साजरा करतात, पण त्याचं कारण जरासं अस्पष्ट आहे.

BAF चा वर्धापनदिन २८ सप्टेंबर रोजी साजरा करतात, कारण १९७१ साली त्या दिवशी, त्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या अगदी आधी, त्यांच्या वायुसेनेचा जन्म झाला होता, भारतातील दिमापुर या ठिकाणी.

तर, आपला वायुसेना दिवस पूर्वी कुठल्या तारखेला साजरा करायचे याचा शोध लागला का?

पूर्वी वायुसेना दिवस १ एप्रिलला साजरा व्हायचा, कारण त्या दिवशी वायुसेनेचं पहिलं स्क्वॉड्रन स्थापन झालं होतं.

पण भारतीय वायुसेनेचा जन्म खऱ्या अर्थाने ८ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला म्हणून हीच तारीख ठरवण्यात आली.

आणि नाही, या बदलाचा एप्रिल फूल्स डे शी काहीही संबंध नव्हता!

तर चला, ९१ व्या वायुसेना दिनानिमित्त, भारतीय वायूसेनेच्या ‘एअर वॉरियर्स’ ना सलाम करूया.

©अविनाश चिकटे

फोटो सौजन्यः भारतीय वायुसेना आणि भारत रक्षक

हा लेख प्रथम indiatimes.com वर प्रकाशित झाला होता

4 thoughts on “भारतीय वायूसेनेच्या वर्धापन दिनाचा इतिहास  ”

  1. Air Mshl Ajit Bhonsle

    Very well chronicled with lucidity of conversational English !
    Air Mshl Ajit Bhonsle

Leave a Reply

You cannot copy content.

%d bloggers like this: